तर महापौर मुक्ता टिळक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रोप्यमहोत्सवावर केलेला खर्च भरून देणार का?

भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचा महापौरांना सवाल

पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण यावरून सुरु झालेला वाद काही केल्या थांबताना दिसत नाही. आता भाऊ रंगारी गणपती ट्रस्टने महापौर मुक्ता टिळक यांच्या सोबत झालेल्या चर्चेमधील संभाषणाची एक ऑडीओ क्लिप समोर आणली असून या क्लिपमध्ये टिळक यांनी  ‘भाऊसाहेब रंगारीनी गणेशोत्सवाला सुरुवात केली हे मान्य आहे मात्र याचा प्रचार प्रसार हा लोकमान्य टिळकांनी केला’ असल्याच बोलल आहे. याच गोष्टीचा धागा पकडत भाऊ रंगारी ट्रस्टकडून महापौर मुक्ता टिळक या आपले शब्द बदलत मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची फसवणूक करत असल्याचा दावा केला आहे.

काही दिवसापूर्वी भाऊ रंगारी गणपती ट्रस्ट आणि महापौर मुक्ता टिळक यांची केसरी वाड्यामध्ये बैठक झाली होती. या बैठकीमध्ये वरील संभाषण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. महापौरांसोबत झालेल्या बैठकीत भाऊसाहेब रंगारी यांचा फोटो पालिकेला देण्यात आला होता. मात्र तो छापण्यात आलेला नाही. काही मंडळाचा विरोध होता म्हणून भाऊसाहेब रंगारी यांचा फोटो लावण्यात आला नाही, असे स्पष्टीकरण महापौरांनी दिले असून कोणत्या मंडळाने विरोध केला याची माहिती त्या देत नाहीत. यातूनच त्यांची मानसिकता दिसत असल्याच भाऊ रंगारी ट्रस्टकडून सांगण्यात आल आहे.

सदरील वादावर कोर्टात पिटीशन दाखल करण्यात आल असून कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागल्यास पुणे महापालिका सध्या शतकोत्तर रोप्यमहोत्सवी वर्ष म्हणून करत असलेल्या कोट्यावधीच्या खर्चाची भरपाई महापौर मुक्ता टिळक या स्वत करणार का असा प्रश्न ट्रस्टचे विश्वस्त सुरज रेणुसे यांनी केला आहे

दरम्यान दोन दिवसांपूर्वी शनिवार वाड्यावर झालेल्या पुणे महापालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर रोप्यमहोत्सवी पर्वाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी सार्वजनिक  गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांनीच सुरु केला असून आता जनक कोण याचा वाद थांबवण्याचे आवाहन भाऊ रंगारी ट्रस्टला केले होते.