पुणे : मार्केटयार्डात ४३० भाजीपाल्यांच्या गाड्या दाखल

पुणे : करोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी बाजार समितीकडून मार्केट यार्डात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच भाजीपाला जरी जीवनावश्यक असला तरी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणून दिवसाआड भाजीपाला आणि कांदा-बटाटा तसेच फळ विभागाचे कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात भाजीपाल्याची नियमित आवक सुरू झाली असून घाऊक बाजारात मंगळवारी ४३० गाड्यांमधून भाजीपाल्याची आवक झाली. मांजरी, मोशी तसेच खडकीतील उपबाजारातही मोठी आवक झाली.

त्यानुसार सोमवारी बाजारात फळे आणि कांदा बटाट्याच्या गाड्यांची आवक सुरू झाली. त्यात १२२ गाड्या कांदा-बटाट्याच्या होत्या. मंगळवारी पहाटे बाजाराचे कामकाज सुरू झाल्यानंतर बाजारात टप्याटप्याने आडते, मुख्य खरेदीदारांना प्रवेश देण्यात आला.

दरम्यान, मंगळवारी मार्केटयार्डातील बाजारात भाजीपाल्याच्या ४३० गाड्या दाखल झाल्या. बाजार समितीचे ४०० कर्मचारी कामकाजाची पाहणी करत होते. दुपारी बारा वाजेपर्यंत बाजारातील सर्व व्यवहार पार पडले. खडकी, मोशी येथील बाजारातही मंगळवावारी आवक झाली, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.