पुणे : मार्केटयार्डात डाळींबाची विक्रमी आवक, ६०० ते ६५० टन डाळींब दाखल

पुणे : डाळींबाचा हंगाम बहरल्याने रविवारी गुलटेकडी मार्केटयार्डातील फळबाजारात हंगामातील विक्रमी आवक झाली. मागणीपेक्षा आवक वाढल्यामुळे डाळिंबाचे भाव सुमारे पाच ते दहा टक्क्यांनी उतरले आहेत. श्रावण महिना सुरू असून त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असल्याने येत्या काळात डाळिंबांना मागणी वाढून दर थोडे वधारतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मागील आठवड्यात स्वातंत्र्यदिन, नागपंचमी तसेच शनिवारी बाजारास असलेली साप्ताहिक सुट्टी याखेरीज पुणे विभागातील बहुतांश ठिकाणी पावसास सुरवात झाल्याने त्याचा परिणाम आवकेवर झाला आहे. सध्या घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत असून एक किलोसाठी डाळिंबाला ५० ते ६० रुपये मोजावे लागत आहे.

साधारणत: ऑगस्ट महिन्यापासून डाळिंबाचा हंगाम सुरू होतो. जिल्ह्यासह राज्यात गेल्या चार ते पाच वर्षांत डाळिंबाच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला असून मागणीपेक्षा जास्त आवक होत असल्याने दरात अलीकडील काळात मोठी घट झाली आहे. सध्यस्थितीत नगर, इंदापूर, सातारा, बारामती, पुरंदर, सांगोला, सोलापूर, पंढरपूर परिसरातून डाळींब बाजारात दाखल होत आहे. रविवारी येथील मार्केटयार्डात तब्बल २५० टेम्पोतून ६०० ते ६५० टन डाळींबाची आवक झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला.

व्यापाऱ्यांचे काय म्हणणे आहे ?
जिल्ह्यात विविध पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परिणामी, डाळींबावर रोग पडतील तसेच डाळींबावर डाग पडून दर कमी मिळतील या भितीमुळे यामुळे शेतकऱ्यांनी मालाची तोडणी केली आहे. येथील बाजारात चांगल्या प्रतीच्या मालाची ४० टक्के तर हलक्या प्रतीच्या ६० टक्के मालाची आवक होत आहे. फळाला चव चांगली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत डाळींबाला मागणी कमी आहे. सध्यस्थितीत राज्यासह जम्मू-काश्मीर, आसाम तसेच उत्तरप्रदेश येथून मागणी होत आहे.
-सिध्दार्थ खैरे (व्यापारी)

राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ नंतर आता राज्यात काँग्रेसची ‘जनसंघर्ष’ यात्रा