मोहन जोशींना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी केलं बापटांना खासदार घोषित !

पुणे : पुणे लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसकडून उमेदवारी घोषित करण्यास लागत असलेला विलंब हा मोठ्या चर्चेचा आणि चेष्टेचा विषय बनला होता. काल रात्री उशिरा बहुचर्चित पुणे लोकसभा मतदार संघातील उमेदवारीची माळ माजी आमदार मोहन जोशी यांच्या गळ्यात पडली. आता जोशींचा सामना पुण्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे मातब्बर नेते गिरीश बापट यांच्या सोबत होणार आहे.

कालपर्यंत तिकीट मिळविण्याच्या शर्यतीत संभाजी ब्रिगेडमधून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रवीण गायकवाड,महानगरपालिकेतील गटनेते अरविंद सावंत हे होते. मात्र उमेदवारी मिळाली ती मोहन जोशी यानांच. बापट हे स्वतः पुण्याचे पालकमंत्री आहेत. ९८ नगरसेवक,८ आमदार,२ विद्यमान खासदारांचे बळ पाठीशी असणाऱ्या बापट यांच्या कार्यकर्त्यांना विजयाची खात्री आहे.

दुसऱ्या बाजूला गटबाजीने त्रस्त अश्या कॉंग्रेस पक्षाकडून जोशी यांना उमेदवारी घोषित होताच हा सामना एकतर्फी होईल अशी भाबडी आशा बापटांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना आहे. यामुळेच काही कार्यकर्त्यांनी जोशींना तिकीट जाहीर होताच आपल्या गाडीवर खासदार गिरीश बापट असे पोस्टर बनवून घेवून लावले आहेत.

येत्या २३ एप्रिल रोजी पुण्याच्या जागेसाठी मतदान होणार असून या निवडणुकीचा २३ मे रोजी निकाल काय लावायचा हे जनता जनार्धनाच्या हातात आहे. दरम्यान, आगामी लढाई सोपी नाही हे बापट यांना देखील चांगलेच ठाऊक आहे. विरोधक विखुरलेले असले तरीही त्यांच्या पुण्यातील ताकत बापट यांना चांगलीच ठाऊक आहे. विरोधकांनी एकदिलाने काम केल्यास बापट यांना चांगलेच झुंजायला भाग पाडले जाऊ शकते हि परिस्थिती विसरून चालणार नाही.