ना बापट ना काकडे, पुण्यातून भाजप देणार या युवा चेहऱ्याला संधी ?

murlidhar mohol & jagdish mulik

पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघातून सत्ताधारी भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी राज्यसभा खा. संजय काकडे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्यामध्ये रेस असल्याचं बोलल जात आहे. मात्र दुसरीकडे भाजप नेतृत्वाकडून नवीनच खेळी खेळण्यात आल्याचं दिसत असून. पक्षाकडून करण्यात आलेल्या सर्व्हेमधून दोन तरुण चेहरे समोर आले आहेत. यामध्ये स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि वडगाव शेरीचे आ. जगदीश मुळीक यांचा समावेश आहे.

२०१४ प्रमाणे आगामी निवडणुकीत देखील पुणे लोकसभा मतदारसंघात कमळ फुलवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुणे क्लस्टरच्या शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. दरम्यान, या बैठकीनंतर आता भाजपचा नवीन सर्व्हे समोर आला असून यामध्ये संजय काकडे आणि गिरीश बापट यांची नावे मागे पडली आहेत. तर युवा चेहरे असणारे मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक हे उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

मोहोळ आणि मुळीक यांच्यामध्ये देखील मोहोळ यांचे पारडे सध्या जड असल्याचं दिसत आहे. मोहोळ यांनी स्थायी समितीच्या माध्यमातून स्व;पक्ष आणि विरोधकांमध्ये देखील आपली प्रतिमा तयार केली आहे. दरम्यान, भाजपचा सर्व्हे हा लोकसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेले खा काकडे आणि गिरीश बापट, विद्यमान खा. अनिल शिरोळे  यांना धक्का मानला जात आहे. तर जाहीरपणे न बोलताही लोकसभा लढवण्याची सुप्त इच्छा असणारे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांचे नावही मागे पडले आहे.