पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चीन दौऱ्यातील शिष्टमंडळात पुण्यातील भूखंड माफिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच चीन दौऱ्यावर गेले होते. हाच दौरा आता वादात सापडताना दिसत आहे. कारण या दौऱ्यातील शिष्टमंडळात मित्रमंडळ चौकातील साडेनऊ एकर जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकसकाचा समावेश करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी केला आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना निवेदन देण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान कार्यालयालाही पत्र पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्वती पायथा येथील मित्रमंडळ चौकातील पाचशे कोटींच्या साडेनऊ एकर भूखंडाचा मालकी हक्कावरून वाद न्यायप्रविष्ट आहे. या भूखंडावर सत्ताधारी भाजपशी संबंधित विकसकाने पाच महिन्यांपूर्वी पत्रे बांधून त्याचा ताबा घेतला होता. त्याविरोधात महापालिकेने जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निर्णय देत संबंधित विकसकाला पंधरा दिवसांत अतिक्रमण हटविण्याचा आदेश दिला होता. त्यावर संबंधित विकसकाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

त्यानंतर उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना संबंधित विकसकाचा आणि त्याच्या दोन्ही मुलांचा समावेश पंतप्रधान मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या चीन दौऱ्यातील शिष्टमंडळात करण्यात आला होता. त्यामुळे भाजपचा पारदर्शकपणाचा मुखवटा ढासळला आहे, असा आरोप सुभाष जगताप यांनी केला.