पिफ २०१९ अंतर्गत होणा-या मराठी स्पर्धा विभागातील चित्रपटांची घोषणा

पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात यंदाच्या वर्षी सात चित्रपट निवडले गेले आहेत. महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी या चित्रपटांच्या नावांसह महोत्सवात परीक्षण करणा-या तज्ज्ञ परीक्षकांची नावे, ‘पिफ फोरम’ अंतर्गत होणारे कार्यक्रम, ‘रेट्रोस्पेक्टिव्ह’, ट्रिब्युट, देश-विशेष (कंट्री फोकस), विद्यार्थी स्पर्धात्मक विभाग या अंतर्गत निवडल्या गेलेल्या चित्रपटांची माहिती आज जाहीर केली. येत्या १० ते १७ जानेवारी, २०१९ दरम्यान होणा-या या महोत्सवासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. पटेल बोलत होते. याबरोबरच चिली देशांतील ‘डॅम किड्स’ हा गोन्जालो जस्टिनिअॅनो दिग्दर्शित स्पॅनिश चित्रपट यावर्षीच्या ‘पिफ’ची ‘ओपनिंग फिल्म’ असणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Loading...

महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आणि महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, सतीश आळेकर, अभिजित रणदिवे, फाउंडेशनच्या विश्वस्त सबिना संघवी, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (एनएफएआय) संचालक प्रकाश मगदूम हे देखील यावेळी उपस्थित होते.

यावर्षी विविध विषयांवर भाष्य करण्याबरोबरच हलके फुलके विषय देखील समर्थपणे मांडणा-या सात मराठी चित्रपटांची निवड ‘पिफ’ अंतर्गत असलेल्या मराठी स्पर्धात्मक विभागात झाली आहे. यामध्ये मुळशी पॅटर्न, नाळ, खटला बिटला, भोंगा, चुंबक, बोधी, दिठी या चित्रपटांचा समावेश आहे.

याशिवाय यावर्षी ‘रेट्रोस्पेक्टिव्ह’मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक मेहबूब खान (भारतीय) यांचे ‘अमर’, ‘अंदाज’ आणि ‘मदर इंडिया’ हे चित्रपट तर इटालियन दिग्दर्शक बर्नार्डो बर्टोलुस्सी (आंतरराष्ट्रीय) यांचे ‘द लास्ट एम्परर’, ‘लिटील बुद्धा’ आणि ‘लास्ट टॅन्गो इन पॅरिस’ हे चित्रपट दाखविले जातील.

याबरोबरच नजीकच्या काळात निधन पावलेल्या काही मान्यवर कलाकारांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी ‘ट्रिब्युट’ विभागा अंतर्गत अभिनेत्री श्रीदेवी यांचा ‘इंग्लिश विंग्लिश’, दिग्दर्शिका कल्पना लाझमी यांचा ‘रुदाली’ आणि पटकथाकार शिनोबु हशीमोटो यांचा ‘टू लिव्ह’ हे चित्रपट दाखविण्यात येतील. तर ज्येष्ठ दिग्दर्शक मृणाल सेन यांचा ‘भुवन शोम’ हा चित्रपट दाखवून त्यांना आदरांजली वाहिली जाणार आहे.

तर देश-विशेष (कंट्री फोकस) विभागात हंगेरीचे ४, अर्जेंटीनाचे ६ तर टर्कीमधली ३ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. याशिवाय विद्यार्थी विभागातील लाईव्ह अॅक्शन विभागात लिथुनिया, अमेरिका, भारत, स्वित्झर्लंड आणि मॅक्सिको या पाच देशातील सहा चित्रपट तर अॅनिमेशन विभागात अमेरिका, इटली, झेक रिपब्लिक, इंग्लंड, भारत, स्लोव्हाकीया, फ्रांस, स्वीडन, ब्राझील, रशिया या दहा देशातील एकूण १६ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

याशिवाय ज्या रसिकांना त्यांच्या कार्यालयीन वेळांच्या कारणामुळे ‘पिफ’मधील चित्रपटांचा आस्वाद घेता येत नाही, अशा चित्रपट रसिकांना ते शक्य व्हावे यासाठी रात्री ९ ते ११ या वेळेतही एनएफएआयमध्ये चित्रपट दाखविले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी यावेळी दिली. याशिवाय संग्रहालयाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त एका खास प्रदर्शनीचे आयोजन देखील ‘पिफ फोरम’ मध्ये करण्यात येणार आहे.

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने ‘पिफ’ अंतर्गत महात्मा गांधी यांना चलचित्र आदरांजली वाहण्यात येणार असून ‘इन सर्च ऑफ ट्रुथ- सेलिब्रेटिंग १५० इयर बर्थ ऍनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी’ अशी यंदाच्या ‘पिफ’ची प्रमुख ‘थीम’ आहे. याचाच एक भाग म्हणून श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेली ‘द मेकिंग ऑफ महात्मा’ आणि रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

महोत्सवादरम्यान दाखविल्या जाणा-या चित्रपटांच्या परीक्षणासाठी जगभरातून ७ देशातील एकूण आठ तज्ज्ञ परिक्षकांची निवड करण्यात आली असून यामध्ये भारतातील प्रसिद्ध लघुपट दिग्दर्शक बी. लेनिन, स्वीडनचे अभिनेते आणि दिग्दर्शक क्रिस्टर होमग्रेन, इटलीची वेशभूषाकार डॅनिएला सिअॅन्सिओ, फिलिपिन्सचे सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व निर्माते जोसेफ इस्त्राईल लेबन, भारतातील ‘जलवा’, ‘तेजाब’, ‘खलनायक’ आणि ‘रंग दे बसंती’ या चित्रपटांचे पटकथा लेखक कमलेश पांडे, श्रीलंकेचे दिग्दर्शक प्रसन्ना विथांगे, इराणच्या प्रसिद्ध अभिनेत्री शबनम घोलीखानी, जर्मनीचे दिग्दर्शक आणि सिनॅमॅटोग्राफार थोर्सटन श्युट यांचा समावेश आहे.

याबरोबरच ‘पिफ फोरम’मधील कार्यक्रम हेदेखील दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या पिफचे वैशिष्ठ्य असणार आहेत. यामध्ये दर्जेदार चित्रपट पाहण्याबरोबरच चित्रपटांशी संबंधित मान्यवर व्यक्तींची व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा आणि चर्चासत्रांच्या माध्यमातून चित्रपटांची विविध अंगांनी माहिती या ठिकाणी मिळणार आहे.

पिफ फोरमच्या प्रवेशद्वारास ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके आणि ज्येष्ठ कवी व गीतकार ग. दि. माडगूळकर यांचे नाव देण्यात येणार आहे, तर या फोरमच्या व्यासपीठास ज्येष्ठ लेखक पु. ल. देशपांडे यांचे नाव दिले जाणार आहे. याबरोबरच ज्येष्ठ संगीतकार नौशाद, स्नेहल भाटकर आणि ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखाँ यांच्या आठवणींनाही या ठिकाणी उजाळा देण्यात येणार आहे.

या वर्षी लष्कर भागातील आयनॉक्स चित्रपटगृहाचाही महोत्सवाच्या चित्रपटगृहांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभागातील चित्रपट पुढीलप्रमाणे-
१) मुळशी पॅटर्न (दिग्दर्शक – प्रवीण विठ्ठल तरडे)
२) नाळ (दिग्दर्शक- सुधाकर रेड्डी यक्कंट्टी)
३) खटला बिताला (दिग्दर्शक – परेश मोकाशी)
४) भोंगा (दिग्दर्शक- शिवाजी लोटन पाटील)
५) चुंबक (दिग्दर्शक- संदीप मोदी)
६) बोधी (दिग्दर्शक – विनीत चंद्रशेखरन)
७) दिठी (दिग्दर्शक- सुमित्रा भावे)

महोत्सवात ११ ते १७ जानेवारी दरम्यान ‘पिफ फोरम’मध्ये आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम पुढीलप्रमाणे –

· विजय तेंडूलकर स्मृती व्याख्याना अंतर्गत प्रसिद्ध पटकथालेखक कमलेश पांडे यांचे व्याख्यान
· प्रसिद्ध कलाकार रोहिणी हट्टंगडी यांचे व्याख्यान, विषय ‘माझा प्रवास – अभिनेत्रीचे मनोगत’
· श्याम बेनेगल यांचे ‘द कंटीन्यूड रिलेव्हन्स ऑफ गांधी’ याविषयावर व्याख्यान
· ‘अंधाधुन’ चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्याशी संवाद
· ‘सिंगिंग स्ट्रींग्ज’ या कार्यक्रमाअंतर्गत मानस गोसावी यांचे मोहनवीणावादन
· ‘२०१८ सालातील मराठी चित्रपटांचे यश’ या विषयावर परिसंवाद, सहभाग- प्रवीण तरडे, भाऊराव क-हाडे, दिग्पाल लांजेकर, संदीप जाधव, राजेंद्र शिंदे, सौमित्र पोटे, मेघराज राजेभोसले आणि विनोद सातव
· ‘३६० सिनेमा अॅण्ड ट्रान्समिडीया’ या विषयावर व्याख्यान, सहभाग – चित्रपट निर्माते बायजू कुरूप, विवेक सुवर्णा आणि प्रसिद्ध छायाचित्रकार नीरज गेरा
· इटलीच्या प्रसिद्ध वेशभूषाकार डॅनिएला सिअॅन्सिओ यांचे व्याख्यान
· ‘डॉन स्टुडिओ’चे सादरीकरण
· ‘तपस’ या बॅण्डचे सादरीकरणLoading…


Loading…

Loading...