fbpx

पुणे : कालवा फुटला, तर महापालिका जबाबदार; जलसंपदा विभागाने झटकली जबाबदारी

पुणे : भविष्यात जर कालवा फुटला, तर त्याला महापालिका जबाबदार असेल, असं सांगत जलसंपदा विभागाने कालव्यांची जबाबदारी झटकली आहे. महापालिकेकडून कालव्याच्या जवळच केली जाणारी रस्त्यांची आणि जलवाहिन्या टाकण्याची कामे, यासोबतच कालव्याजवळ वाढत चाललेली अनधिकृत बांधकामे, बेकायदा रस्ते आणि त्यावरील वाहतूक यामुळे कालव्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे सर्व न थांबविल्यास भविष्यात कालवा फुटी झाल्यास त्याला पालिकाच जबाबदार असेल असे पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

दैनिक लोकमतने या संदर्भातील वृत्त दिले आहे. जनता वसाहतीजवळील कालव्याची भिंत पडून मोठ्या प्रमाणावर पाणी दांडेकर पूल येथील वसाहतींमध्ये घुसले होते या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने हे पत्र लिहिले आहे. कालवा फुटल्यामुळे झालेली हानी लक्षात घेता असा प्रकार पुन्हा घडू नये याकरिता जलसंपदा विभागाकडून पावसाळ्याआधीच कालव्याची दुरुस्ती, गाळ काढणे आणि गळती रोखण्याची कामे करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतू, या व्यतिरिक्त महापालिका हद्दीतील अनधिकृत गोष्टींमुळे जर कालवा फुटला तर त्याची जबाबदारी महापालिकेची असे असेल असे सांगत जलसंपदा विभागाने एकप्रकारे निर्वाणीचा इशाराच दिला आहे.