fbpx

28 तास ५ मिनिटांच्या दिमाखात पुण्यातील विसर्जन मिरवणुक संपन्न

वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी (५ सप्टेंबर) दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने झाली. यंदाची विसर्जन मिरवणूक किती तासांची असेल याची उत्सुकता सामान्यांना देखील होती . कारण गेल्या काही वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीसाठी लागणारा वेळ वाढत चालला होता. यंदा मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ मिनिटे लवकर मिरवणूक संपली . विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी तसेच शहरात कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्यासह संपूर्ण शहरात नऊ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता .

फुलांची उधळण, रंगोळीच्या पायघड्या, ढोलताशाचा गजर, सनई चौघडयाचे मंगलमय सुर अन बाप्पाचा जयघोष अशा भक्तिमय वातावाराणात वैभवशाली मिरवणुकीने शहरातील मानाच्या पाच गणपतीना निरोप देण्यात आला. नेहमीच्या परंपरेनुसार विसर्जन मिरवणूक सकाळी 10.30 वाजता सुरु झाली. यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने ही मिरवणुक ऐतिहासिक ठरली.

शहरातील महात्मा फुले मंडई समोरील लोकमान्य टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीला सुरुवात झाली. महापौर मुक्ता टिलक, उप महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, माजी खासदार सुरेश कलमाडी, आमदार नीलम गोह्रे, मेधा कुलकर्णी, अनंत गाडगीळ, माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, पालिका आयुक्त कुणाल कुमार, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यासह पक्ष-संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

भवानी पेठेतल्या गोकुळ वस्ताद तालीम तरुण मंडळ, ट्रस्ट या शेवटच्या मंडळाच्या बाप्पाचे आज दुपारी २ वाजून २० मिनिटांनी नटेश्वर घाटावर विसर्जन करण्यात आले. त्यानंतर पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडल्याचे पोलिसांकडून जाहीर करण्यात आले. यंदाची विसर्जन मिरवणूक गतवर्षी पेक्षा २५ मिनिट अगोदर मार्गी लागली असली तरी ती तब्बल २८ तास ५ मिनिट चालली.

मुख्य विसर्जन मिरवणुकीसाठी चार मुख्य मार्ग होते. यामध्ये लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आणि टिळक रस्ता या मार्गांचा समावेश होता. यांपैकी लक्ष्मी रस्त्यावरून २४१, टिळक रस्त्यावरून १९७, कुमठेकर रस्त्यावरून ४७, केळकर रस्त्यावरून १२७ असे एकूण ६१२ गणेश मंडळे या चारही रस्त्यांवरून मार्गस्थ झाली होती.

या विसर्जन कार्यक्रमासाठी एकूण ८४७ पोलीस अधिकारी, ७८७० पोलीस कर्मचारी तर एसआरपीएफच्या ३ तुकड्या असा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तब्बल 5 हजार फूट सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळयांच्या पायघड्या. पारंपारीक वाद्यासह ढोलताशा चा गजर, सनई चौघडयाचे मंगलमय सूर आणि गणपत्ती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे साकडे घालत भक्तिमय वातावारणात पुणेकरांनी लाडक्या गणरायाला मंगळवारी वैभवशाली मिरवणुकीने निरोप दिला.