पुणे जिल्ह्यातील वाडीपाडे झाले ‘प्रकाशमान’

पुणे, दि. ४ ऑक्टोबर २०१८ : पुणे जिल्ह्यातील १०३१३ वाडीपाड्यांच्या विद्युतीकरणाचे काम महावितरणकडून पूर्ण करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील शासनाद्वारे अधिसूचित १०३१३ वाडीपाड्यांचे विद्युतीकरणाचे महावितरणसमोर उद्दिष्ट होते. केंद्र शासनाच्या दिनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना तसेच महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा विकास व नियोजन परिषद या योजनेद्वारे या सर्व वाडीपाड्यांच्या विद्युतीकरणाची कामे महावितरणकडून पूर्ण करण्यात आलेली आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुर्गम, डोंगराळ अशा भागात वीजयंत्रणा उभारून तब्बल १०३१३ वाडीपाड्यांच्या विद्युतीकरणाचे काम महावितरणने यशस्वीपणे पूर्ण केले आहे. मुख्य वस्ती किंवा गावांपासून दूर असलेले वाडीपाडे सुद्धा शासनाच्या योजनेद्वारे महावितरणने प्रकाशमान केले आहेत. त्यामुळे या भागातील विकासकामास गती प्राप्त होईल.

पुणे जिल्ह्यातील अतिशय दुर्गम व ज्या ठिकाणी वीजयंत्रणा उभारणे शक्यच नाही अशा भागात असलेल्या १८ वाडीपाड्यांना अपारंपरिक ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यासाठी योजना प्रस्तावित आहे. यासंदर्भात महाऊर्जाकडे (MEDA) पाठपुरावा सुरु आहे व लवकरच कामे पूर्ण होणार असून हे शिल्लक वाडीपाडे प्रकाशमान करण्यात येतील.