‘पुणे सायक्लोथॉन’मधून दिसणार’आठवणीतलं पुणं…सायकलींचं पुणं’

cyclothone,bicycle competition,

पुणे : लोकबिरादरी मित्र मंडळ ट्रस्ट, पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि शिक्षण प्रसारक मंडळीचे स. प. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आठवणींचं पुणं…सायकलींचं पुणं’ या संकल्पनेवर आधारित ‘पुणे सायक्लोथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. ही पुणे सायक्लोथॉन रविवार, दि. १७ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी ६.०० ते ९.०० या वेळेत होणार असून, टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या आवारातून या सायक्लोथॉनला सुरुवात होणार आहे, अशी माहिती लोकबिरादरी मित्र मंडळ ट्रस्ट पुणेचे शिल्पा तांबे, योगेश कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. प्रभाकर देसाई, स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ आणि रोडमास्टर सायकलचे आनंद वांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रा. दिलीप शेठ म्हणाले, पूर्वी शाळा-महाविद्यालयात सायकल वापरली जात असे. त्यासाठी स्वतंत्र सायकल स्टॅन्ड असत. आज दुचाकींची संख्या वाढली आहे. त्यामुळे सायकल दुर्मिळ झाली आहे. पुण्याला पुन्हा एकदा सायकलींचे शहर ही ओळख द्यावी. तसेच विद्यार्थी आणि तरुणांमध्ये व्यक्तिगत सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत व्हावे, प्रदूषणमुक्त पुणे शहरासाठी पुन्हा सायकलींचा वापर वाढावा, आरोग्यासाठी आणि छोट्या अंतरासाठी सायकलचा वापर व्हावा, युवा स्वयंसेवकांना आपल्यातील कौशल्य विकसित करता यावीत, या उद्देशाने या सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे.

प्रोफेशनल सायकलिंग ग्रुप्स, सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पोस्टमन, सीए, डॉक्टर्स, व्यावसायिक व नोकरदार अशा सर्वच वर्गातील लोक या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होत आहेत. ही सायकल रॅली २२ किलोमीटर, १२ किलोमीटर आणि ७ किलोमीटर अशा तीन प्रमुख मार्गांमध्ये विभागण्यात आली आहे. पहिला मार्ग (२२ किलोमीटर) स. प. महाविद्यालयापासून अलका टॉकीज, गुडलक चौक, फर्ग्युसन महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, गणेशखिंड रास्ता, पुणे विद्यापीठ, पाषाण, बावधन, चांदणी चौक, पौड रस्ता, कर्वे रास्ता, अलका टॉकीज, स. प. महाविद्यालय असा आहे.

Loading...

दुसरा मार्ग (१२ किलोमीटर) स. प. महाविद्यालयापासून निघून अलका टॉकीज, गुडलक चौक, फर्ग्युसन महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, गणेशखिंड रास्ता, पुणे विद्यापीठ, चतुःशृंगी मंदिर, सेनापती बापट रस्ता, सिम्बायोसिस महाविद्यालय, लॉ कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता, अलका टॉकीज, स. प. महाविद्यालय असा आहे. ७ किलोमीटरचा तिसरा मार्ग शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी असून, तो स. प. महाविद्यालयापासून निघून अलका टॉकीज, गुडलक चौक, भांडारकर रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता, अलका टॉकीज, स. प. महाविद्यालय असा आहे. ज्येष्ठ नागरिक, सर्वात छोटा सायकलस्वार, पोस्टमन, मोठा गट, चांगला मेसेज असे सन्मानही यावेळी केले जाणार आहेत.

सायकलींचे पुणे अशी ओळख असलेल्या पुण्यात पुन्हा सायकली धावाव्यात व पर्यावरण रक्षणासाठी आपले योगदान द्यावे, या उद्देशाने शहरातील प्रमुख शाळा-महाविद्यालयातून सर्वच विद्यार्थी यामध्ये सहभागी होत आहेत. या संपूर्ण सायक्लोथॉनचे नियोजनही विद्यार्थ्यांच्या पुढाकारातूनच झाले आहे. लोकबिरादरीचे १८-२३ वयोगटातील स्वयंसेवक यासाठी अपार मेहनत घेत आहेत. त्यामध्ये अनिकेत गायकवाड, भावना गिरी, मनीष जाधव, पार्थ कुलकर्णी, सलोनी कुलकर्णी, उर्वी तांबे, तन्वी श्रीखंडे, शुभम देशपांडे या युवकांचा उत्साह यामागे आहे, असे शिल्पा तांबे आणि योगेश कुलकर्णी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना यामध्ये मोफत सहभागी होता येणार असून, इतरांसाठी १०० रुपये इतके शुल्क असणार आहे. मात्र, नोंदणी अनिवार्य आहे, असेही ते म्हणाले. अधिक माहितीसाठी शिल्पा तांबे (९२२६९५८८८८) आणि योगेश कुलकर्णी (९८२२२७३५४५) या क्रमांकावर संपर्क करावा. ऑनलाइन नोंदणीसाठी www.lokbiradari.outgo.co या संकेतस्थळावर भेट द्यावी.