गायीच्या दूध दरामधे प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ,कात्रजच्या दूध दरवाढीचा निर्णय २५ जूनला

पुणे : गायीच्या दूध दरामधे प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या सभेत मंगळवारी घेण्यात आला. ही दरवाढ येत्या ८ तारखेपासून लागू होणार आहे. दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कात्रज येथील पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या सभागृहात बैठक झाली. त्यात दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत दुधाच्या भावात वाढ करण्याचा निर्णय घेतला असला तरी तूर्तास कात्रजच्या दूधाचे भाव पूर्वी प्रमाणेच असतील असं जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी सांगितले. येत्या २५ जून रोजी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची बैठक बोलावली जाईल. त्यात दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात येईल. त्यात दरवाढीचा निर्णय होणार असल्याचे हिंगे यांनी सांगितले.