fbpx

थकबाकी वसूलीसाठी मिळकतकर विभागाची मोहीम

pune mahapalika125

पुणे: चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात देण्यात आलेले उत्पन्नाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या मिळकतकर विभागाने विशेष मोहिम हाती घेतली आहे. पुढील चार महिन्यात थकबाकीदारांकडून १ हजार कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दीष्ट मिळकतकर विभागाने  ठेवल्याची माहिती  विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली आहे.

महापालिकेच्या २०१७-१८ च्या अंदाजपत्रकामध्ये मिळकतकर विभागाला सुमारे १ हजार ८१६ कोटी रूपयांचे उद्दीष्ट दिले आहे. मात्र, २४ नोव्हेंबर अखेर या विभागाला केवळ ८०२ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळालेले आहे. या विभागाकडे शहरातील सुमारे ८ लाख ४० हजार मिळकतींच्या नोंदी आहेत. तर त्यांच्या कराची मागणीही सुमारे १२०० कोटींवर आहे. त्यामुळे या विभागाकडून पुढील चार महिन्यात थकबाकी वसूलीसाठी विशेष मोहिम हाती घेण्यात येणार आहे. वसुल होणा-या थकबाकीसाठी पेठ निरिक्षकांना थकबाकी निहाय उद्दीष्ट देण्यात आले आहे. तसेच लवकरच थकबाकी वसूलीसाठीचा बॅन्ड वाजा वादनाचा उपक्रमही सुरू करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर बाबी तपासण्यात येत आहेत.

दरम्यान, महापालिकेच्या मिळकतकर विभागाची थकबाकी १५०० कोटींच्या वर आहे. मात्र, त्यातील अनेक थकबाक्या दुबार नोंदणी, न्यायालयातील दावे यामुळे वर्षानुवर्षे वसूल झालेली नाही. या वसूलीसाठी मोठा वेळ आणि मनुष्यबळही लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने वसूल होणा-या थकबाकीवरच लक्ष केंद्रीत केले आहे. ज्या मिळकतधारकांची २००८ नंतर कर आकारणी झालेली आहे, मात्र अद्याप कर भरलेला नाही, अशी थकबाकी वसूल करण्यावर भर दिला जाणार आहे, असेही कानडे यांनी सांगितले.