fbpx

महापौर तुम्हांला पालिका कर्मचाऱ्यांवर भरोसा नाय का ?

mayour mukta tilak

पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर रोप्य महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे, या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचे ‘रंगारंग’ सोहळ्यात उदघाटन झाले. मुख्यतःहा पालिकेचा कार्यक्रम असल्याने याचे सर्व नियोजन हे महापालिकेच्या विभागामार्फत होण गरजेच आहे. मात्र, पालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांना ‘पालिकेतील कर्मचाऱ्यावर भरोसा नाय का’ अस म्हणण्याची वेळ आली आहे. कारण या कार्यक्रमाच्या नियोजनाचे आणि प्रसिद्धीच काम एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे. केवळ प्रसिद्धीसाठी तब्बल साडेचार लाख रुपये या संस्थेला दिले जाणार आहेत.

गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेतर्फे शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.त्यामध्येही काही वेगळे आणि सांस्कृतिक उपक्रम करण्याऐवजी बाईक रॅली, दरवेळीप्रमाणे अशोक हांडे यांचा मराठी बाणा, गणपती बनवणे, ढोल ताशा स्पर्धा अशा जुन्याच संकल्पनांवर महापालिकेचा भर आहे. इतक्या फुटकळ संकल्पना राबवायच्या होत्या तर नागरिकांच्या करातून पोट भरणाऱ्या खासगी प्रसिद्धीच्या यंत्रणेने कशाचे पैसे घेतले असा सवाल निर्माण होतो आहे. की महापालिकेच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांना त्याच यंत्रणेला काम देण्यात रस होता याचाही उलगडा व्हायला हवा.

पालिकेकडे स्वतचे जनसंपर्क अधिकारी असताना हि एका खासगी संस्थेला काम देवून केवळ चमकोगिरीसाठी पदाधिकाऱ्यांनी पालिका कर्मचारी चांगल्या प्रकारे कार्यक्रम ‘लीड’ करू शकणार नाहीत, हेच दाखवून देण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रश्न निर्माण होत आहे.  खासगी संस्था हे काम ‘पुढे होवून’ करत असल्याने पालिकेचे कर्मचारी चांगलेच ‘बॅकफुट’वर गेले आहेत. पालिकेचा कार्यक्रम असून देखील त्यांचेच अधिकारी मात्र पाहुण्यांसारखे प्रेक्षकांत बसलेले दिसतात.

एकंदरीतच हे सर्व चित्र पाहता पालिकेचे अधिकारी चांगल्या गुणवत्तेचे असतानाही सत्ताधारी मात्र खासगी संस्थाना कामे देवून एका बाजूला जनतेच्या कर रूपातून आलेल्या पैशाच्या ‘चमकोगिरिवर’ उधळपट्टी तर करतायतच, त्याच बरोबर दुसरीकडे आपल्याच अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह देखील निर्माण करत आहेत. एकीकडे कर्ज घेऊन त्याच्या व्याजावर दिवस काढण्याची वेळ आलेल्या महापालिकेत केवळ प्रसिद्धीसाठीचा हा सत्ताधाऱ्यांचा सोस केवळ निंदनीय आहे. सगळीकडे बहुमत देऊनही महापालिकेकडे पैशांचं झाड असल्यासारखी उधळपट्टी करणारे सत्ताधारी कुठला इंडिया घडवणार आहेत याचीच चिंता पुणेकरांना असणार आहे.

भाजपला आपल्या भष्ट्राचाराच्या अजेंड्यात पालिकेतील काही प्रामाणिक अधिकारी साथ देत नाहीत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना आजपर्यंत अनेक टेंडर रद्द करावी लागली आहेत. त्यामुळे आता नवी शक्कल लढवत पालिकेच्या अधिकाऱ्यांना बाजूला ठेवत खासगीकरणाचा घाट घालून सगळे कार्यक्रम केले जात आहेत. दिल्ली पासून गल्ली पर्यंत खासगीकरण करून लोकांचे पैसे लोकशाही मार्गाने घेता येत नसल्याने अशा मार्गाने घेत आहे. गणपतीच्या कालावधीत केवळ २० दिवस हि खासगी संस्था काम करणार आहे आणि त्यासाठी साडेचार लाखांचे काम कोणत्या नियमाने दिले हे कळत नाही – चेतन तुपे ,विरोधीपक्ष नेते.