पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमध्ये होणार फेरबदल

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बदलांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. याची सुरुवात युवकांच्या संघटनाची जबाबदारी असणाऱ्या राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकारी बदलापासून होणार आहे.

बुधवारी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण आढावा बैठक बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडली. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, ‘युवक’चे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, शहाराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्यामध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये  नव्या दमाच्या युवकांना पक्षामध्ये स्थान देण्यासाठी शहर युवक आघाडीमध्ये फेररचनेचा निर्णय घेण्यात आला आहे.

वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार येत्या एक महिन्यांत युवक आघाडीच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार असून नव्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देऊन संधी देणार आहे. यात शहर कार्यकारिणी, विधानसभा आणि प्रभाग अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे – राकेश कामठे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस