गडकरी पुतळ्याबाबत जबाबदार नागरिकांनी पालिकेला जाब विचारावा-पुष्कर श्रोत्री

पुतळे उखडाल पण विचार आणि कार्य उखडू शकत नाही- श्रोत्री

पुणे- नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा त्याच जागी सन्मानाने बसविण्यासाठी आता पुण्यातील जबाबदार आणि सुजाण नागरिकांनीच महानगरपालिकेला जाब विचारायला हवा असं मत ‘महाराष्ट्र देशा’ बरोबर बोलताना अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी व्यक्त केलं आहे. पुतळे पाडून त्या व्यक्तीचे विचार तसेच कार्य संपविता येत नाही असं देखील श्रोत्री यांनी म्हटलं आहे.

नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची तोडफोड करून हटवलेल्या प्रकरणाला तब्बल एक वर्ष उलटून गेल्या नंतर देखील अजून गडकरी उपेक्षितच असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे त्यावेळीच गडकरींचा पुतळा पुन्हा सन्मानाने बसविण्याचा एकमुखाने प्रस्ताव महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता मात्र केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे गडकरी अजूनही न्यायाच्याच प्रतीक्षेत आहेत.

नेमकं काय म्हणाले श्रोत्री
मी गडकरींचा पुतळा बसवेपर्यंत पुण्यात प्रयोग करणार नाही अशी भूमिका घेतली होती मात्र पुणेकर रसिकांच्या आग्रहाखातर पुण्यात प्रयोग सुरु केले. ज्या पुणेकर प्रेक्षकांसाठी मी माझं वचन मोडून पुण्यात प्रयोग करू लागलो त्याच पुणेकर प्रेक्षकांनी महानगरपालिकेला पुतळ्याबाबत जाब विचारायला हवा. फक्त कलाकारांनी यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा जबाबदार नागरिकांनी भूमिका घेणं आवश्यक आहे. आम्ही अजूनही आशावादी आहोत की पुतळा त्याच जागी प्रस्थापित केला जाईल मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी फार बोलणार नाही.

नेमकं काय आहे प्रकरण
पुण्यातील जंगली महाराज रोडवर महापालिकेचे संभाजी उद्यान आहे. या उद्यानात राम गणेश गडकरींचा पुतळा होता. आचार्य अत्रे यांच्या हस्ते २३ जानेवारी १९६२मध्ये या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेला हा पुतळा राम गणेश गडकरी स्मारक समितीने पुणे महापालिकेला भेट दिला होता. ‘राजसंन्यास’ या नाटकातून राम गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप करत नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुण्याच्या संभाजी उद्यानातील पुतळा तोडफोड करत हटवण्यात आला होता. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी चार तरुणांविरुद्ध चोरी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आली होती. प्रदीप भानुदास कणसे (वय २५, रा. नऱ्हे आंबेगाव), हर्षवर्धन महादेव मगदूम (२३, रा. बालाजीनगर), स्वप्निल सूर्यकांत काळे (२४, रा. वडमुखवाडी, चऱ्होली, आळंदी), गणेश देवीदास कारले (२६, रा. चांदुस, ता. खेड) अशी आरोपींची नावे आहेत. हातामध्ये कुऱ्हाड आणि हातोडे घेतलेले चार तरुण मध्यरात्री १.५० वाजता उद्यानामध्ये घुसले. त्यांनी पुतळ्यावर कुऱ्हाड आणि हातोड्याने घाव घातले. हा पुतळा खाली पाडल्यानंतर दोघांनी उचलून उद्यानाच्या पाठीमागूनच वाहात असलेल्या मुठेच्या पात्रामध्ये नेऊन टाकला. हा सर्व प्रकार अगदी दोन मिनिटांत आटोपला. त्यानंतर, पसार झालेल्या कार्यकर्त्यांनी पहाटेच्या सुमारास हा पुतळा नदीत टाकून दिला.

पुतळा पडल्यानंतरच्या त्यावेळच्या प्रतिक्रिया
पुरोगामी महाराष्ट्रात घडलेली ही घटना काळीमा फासणारी आहे.या घटनेचा मी निषेध करतो- अजित पवार(माजी उपमुख्यमंत्री )
राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्याची घटना निंदनीय आहे.याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत- पालकमंत्री गिरीष बापट
राम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा उभा करु.मतांचं राजकारण करायचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही- प्रशांत जगताप (तत्कालीन महापौर, पुणे)
पुतळा हटवला तरी गडकरी अजरामर राहतील : सामना
मराठा समाज सर्व समाजाचं पालकत्व घेणारा समाज आहे.त्यामुळे शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांच्या नावानं असं करणं,हे त्यांना लहान केल्यासारखं आहे-शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे
संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्यात संभाजी ब्रिगेडचा काहीही संबंध नाही.ज्या मर्द मराठ्यांनी केलं त्यांना सलाम !- नितेश राणे, आमदार काँग्रेस
गडकरींचा पुतळा बसवेपर्यंत पुण्यात प्रयोग नाही : पुष्कर श्रोत्री (अभिनेता)

राम गणेश गडकरी यांचा परिचय
राम गणेश गडकरी (मे २६, इ.स. १८८५; नवसारी, गुजरात – जानेवारी २३, इ.स. १९१९; सावनेर)राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा ’शेक्सपियर’ समजले जाते. ते मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, आणि ‘भावबंधन’ ही चार पूर्ण नाटके (आणि ‘राजसंन्यास’ आणि ‘वेड्यांचा बाजार’ ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.विविध नाट्यप्रेमी संस्थांनी, राम गणेश गडकरी यांच्या आणि त्यांची पत्नी रमाबाई यांच्या नावाने नाटककारांसाठी आणि नाट्याभिनयासाठी अनेक गडकरी पुरस्कार ठेवले आहेत.

पुण्यातील जंगली महाराज रोडवर महापालिकेचं संभाजी उद्यान आहे. या उद्यानात राम गणेश गडकरींचा पुतळा होता. 23 जानेवारी 1962 मध्ये आचार्य अत्रे यांच्या हस्ते संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. पण 1962 साली बसवलेला पुतळा इतक्या वर्षांनी का हटवला असा प्रश्न उपस्थित होत आहे.