कॅंटोन्मेंट बोर्डातर्फे सुरु करण्यात येणार औद्योगिक प्रशिक्षण संस्था

पुणे – शहरातील विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक शिक्षणाचे आणखी एक दार खुले झाले आहे. कॅंटोन्मेंट बोर्डातर्फे लष्कर परिसरात लवकरच आयटीआय (इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) सुरू केले जाणार आहे. येत्या जुलैपासून या संस्थेची प्रवेशप्रक्रीया सुरू होईल, अशी माहिती बोर्ड प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आतापर्यंत पुण्यातील औंध येथे असलेली संस्था ही एकच शासकीय औद्योगिक तंत्रशिक्षण संस्था चालू होती. लष्कर परिसरात सुरू होणाऱ्या या नव्या संस्थेद्वारे विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षणाचे आणखी एक दार खुले होणार आहे. बोर्डाच्या हद्दीतील आयटीआय इन्स्टिट्यूटमध्ये दहा ट्रेड सुरू करावे, यासाठी यासंदर्भात बोर्डाने गतवर्षी पाठविलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून येत्या शैक्षणिक वर्षांपासून हे ट्रेड् सुरू करण्यात येतील, असे बोर्ड प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

त्यातील पाच ट्रेड सुरू करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दिला असून, दहा डिव्हिजन मान्य केल्या आहेत. सध्या या इन्स्टिट्यूटसाठी वर्कशॉप उभारणीचे काम सुरू आहे. हे ट्रेड नॅशनल कौन्सिल फॉर ट्रेनिंग इन द व्होकेशनल ट्रेड्शी (एनसीटीव्हीटी) संलग्न करण्यासाठी अर्ज करण्यात आला असून त्याची प्रक्रिया महिनाभरात पार पडेल. त्यानंतर जुलैपासून प्रवेशप्रक्रिया सुरू केली जाईल.

लष्कर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल शाळेत आयटीआय (इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) सुरू केले जाणार असून त्यांतर्गत पाच व्यवसायाभिमुख कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामध्ये मोटर व्हेहिकल मेकॅनिक, , मेकॅनिकल, ड्राफ्ट्समन, प्लंबर आणि कॉम्प्युटर हार्डवेअर या ट्रेड्चा समावेश आहे. या मान्यताप्राप्त पाच कोर्सेससाठी साधारणतः 192 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. तब्बल साडेसहाशे मशिन्स खरेदी केली जाणार असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मशिनरीच्या खरेदीसाठी 2.50 कोटी ते 2.90 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च कॅंटोन्मेंट बोर्डाच्या निधीतून केला जाणार असून त्यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आली आहे.
.