पुणेकरांनो आमचे पदाधिकारी बावळट नाहीत; सोशल मिडियासह रस्त्यावरही भाजप ट्रोल

पुणेरी पाट्यांच्या माध्यमातून कमी शब्दात जास्त अपमान करण्यासाठी पुणेकर प्रसिद्ध आहेत. एरव्ही इतर पक्षांना ट्रोल करणाऱ्या भाजपला आता त्यांच्याच भाषेत ट्रोल केलं जाऊ लागलं आहे. तेही भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना बावळट म्हटल्यावर . काकडे यांच्या या विधानावर सोशल मिडीयावर विरोधकांनी भाजपला ट्रोल करण्याची संधी सोडलेली नाहीये. मात्र आता दुसरीकडे रस्तावरही खास अशा पुणेरी पाट्या झळकू लागल्या आहेत.

24 तास समान पाणी पुरवठा योजनेच्या निवीदा रद्द करण्यात आल्यानंतर निविदा रद्दचा निर्णय स्थानिक पातळीवर झाल्याचा दावा पालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. मात्र असा दावा करणाऱ्या नेत्यांना भाजपचेच सहयोगी खासदार संजय काकडे यांनी ‘हा निर्णय स्थानिक पातळीवर झाल्याचे सांगणारे पालिकेतील भाजप पदाधिकारी बावळट असल्याचा घरचा आहेर दिला होता’.

काकडेंनी भाजप पदाधिकाऱ्यांना थेट बावळट म्हटल्याने विरोधकांना आयतच चर्चेचा विषय मिळाला आहे. तर पुणे भाजपमध्ये काकडेंच्या विरोधात संतापाची लाट पहायला मिळतेय . हाच मुद्दा घेऊन पुण्यात काही ठिकाणी ‘पुणेकर बंधू भगिनीनो आमचा पदाधिकारी बावळट नाहीये’ अशा आशयाच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत . सामान्य नागरिक हे असा शालजोडे मारणाऱ्या पाट्या लावणार नाही. मात्र, निनावी पाट्या लावून विरोधकांनी भाजपवर वार करण्याची संधी सोडलेली नाही.

यापूर्वी देखील अशाच निनावी पाट्या लावण्यात आल्या होत्या . खा.काकडे यांनी महानगरपालिकेत किती उमेदवार निवडून येतील याचं भाकीत केल्यानंतर त्यावेळी देखील अशाच पाट्या पहायला मिळाल्या होत्या . महापौर मुक्ता टिळक आणि गिरीष बापट यांच्या परदेश दौऱ्यावर अशाच पद्धतीने मार्मिक भाषेत टीका करण्यात आली होती. तर नोटबंदी आणि EVM मशीनमध्ये फेरफार झाल्याचे आरोप झाल्यानंतर देखील पुण्यात ठिक ठिकाणी अशाच खास पुणेरी पाट्या लावण्यात आल्या होत्या.