कॉर्पोरेट प्रसिद्धीचा हव्यास सत्ताधारी भाजपच्या अंगलट

pune mayour mukta tilak

 

पुणे महापालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष मोठ्या दिमाखाने राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध उप्रकम राबवले जाणार आहेत. या कार्यक्रमांचा संदेश ‘जगात’ पोहचवण्यासाठी महापालिकेकडे स्वतःची प्रसिद्धी यंत्रणा असतानाही नागरिकांच्या कररूपी पैशांचा चुराडा करत बाहेरची खासगी प्रसिद्धी यंत्रणा राबवली जात आहे. यावरून आधीच टीकेचा सामना करावा लागत असताना आता आणलेल्या प्रसिद्धी यंत्रणेने भाजपचीच कुप्रसिद्धी केली आहे. त्यामुळे संतापलेल्या महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतल्याचे चित्र बुधवारी महापालिकेत पहायला मिळाले. येत्या आठवड्यात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हा प्रकार घडला आहे.

शनिवार(दि.१२ रोजी) शनिवारवाड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी पर्वाचा उदघाटन सोहळा पार पडला . दरम्यान या कार्यक्रमाची प्रसिद्धीची जबाबदारी घेणाऱ्या एका खासगी यंत्रणेने भाजपच्या अंतर्गत वादावर भाष्य करणारे पत्रक प्रसिद्ध केले. त्यामुळे हे पत्रक महापालिकेच्यावतीने अथवा महापौर टिळक यांच्या परवानगीने काढण्यात आले का असा प्रश्न विचारला असता टिळक यांनी मौन पाळणे पसंत केले. मात्र संबंधित खासगी यंत्रणेला महापालिका पुणेकराच्या कर रूपातून पैसे मोजत असल्याने प्रथम नागरीक म्हणून त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याची मागणी होताच टिळक यांनी संतापून पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.

काय आहे प्रकरण
शनिवारवाड्यावर झालेल्या कार्यक्रमाच प्रशिद्धी पत्रक काढताना संबंधित यंत्रणेने मध्यंतरी भाजपमध्ये रंगलेल्या ‘बावळट’ नाट्यावर भाष्य करत ‘पदाधिकाऱ्यांना बावळट खासदार आणि आम्ही तुम्हाला आमचे नेते मानत नाही असे म्हणणारे पदाधिकारी शतकोत्तरी रौप्य महोत्सवी गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर’ आल्याचे प्रशिद्धी पत्रकात लिहिले होते.