विधानसभा अध्यक्ष व्हायचेच असते तर सहा महिन्यापूर्वीच झालो असतो – पृथ्वीराज चव्हाण

prithviraj-chavan

कराड : एका बाजूला राज्यात कोरोनामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे तर दुसऱ्या बाजूला राज्यात राजकारण देखील जोरात सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असूनही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसइतका प्रभाव पाडू न शकलेल्या काँग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बाळासाहेब थोरात यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी काढून ती सध्या विधानसभेचे अध्यक्ष असलेले काँग्रेसचे आक्रमक नेते नाना पटोले यांना दिली जाणार आहे. तर, पटोले यांच्या पदावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर आगामी काळात संघटनात्मक सुद्धा मोठे फेरबदल झाल्याचे पाहायला मिळेल. पृथ्वीराज चव्हाण यांना मागच्या वेळीसुद्धा विधानसभा अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली होती. पण ती त्यांनी न स्वीकारल्यामुळे आता ही ऑफर ते स्वीकारतात का हे आगामी काळातच स्पष्ट होईल.

मात्र मला अद्यापही पक्षातून कोणी काहीही विचारलेले नाही, असे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्ष व्हायचेच असते तर सहा महिन्यापूर्वीही होता आले असते, असेही आमदार चव्हाण यांनी नमूद केले आहे.

#coronvirus : …तरीही कोरोना पाठ सोडणार नाही; तज्ज्ञांनी वर्तवली शक्यता

माजी मुख्यमंत्री आणि जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेचे अध्यक्षपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. वास्तविक दोन महिन्यांत आमदार चव्हाण यांनी खळबळ उडवणारे कॉग्रेस मधील एकमेव नेतृत्व म्हणून ओळखही निर्माण केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांची चर्चा आहे. दिल्लीच्या काँग्रेस वर्तुळात नेहमी कॉग्रेसच्या कुटूंबातील विचार कॅबिनेटमध्येही आमदार चव्हाण यांचा समावेश आहे. अशी स्थिती असतानाच अचानक त्यांच्या विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. अध्यक्षपदाची चर्चा चालू झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. परंतु पृथ्वीराज बाबांनी त्यांची भूमिका अद्यापही जाहीर केलेली नाही. त्यांची भुमिका नेहमी प्रमाणे गुलदस्त्यातच आहे.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले दिल्लीत आहेत. त्यांनी तेथे पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे पटोले यांची कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाची वर्णी लागेल अशी चर्चा सुरू आहे. त्याबाबत आमदार चव्हाण म्हणाले, नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष व्हायचे आहे. त्यामुळे त्यांनी दिल्लीत लॉबींग केले आहे. त्यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी माझे नाव दिले आहे. पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण आणि कॉग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले, असा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींना दिला आहे, असे समजते. मात्र त्याबाबत पक्षश्रेष्ठींकडून अद्यापही काहीही विचारणा झालेली नाही. त्यामुळे सध्या तरी त्यावर काही मत व्यक्त करणार नाही. राहिला प्रश्न विधानसभा अध्यक्षपदाचा त्या पदावर जायचं असते तर सहा महिन्यापू्र्वीच ते पद घेता आले असते.

भारत चीन सीमा वाद : …त्यामुळे नरेंद्र मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत – डोनाल्ड ट्रम्प