मोदी-फडणवीस यांच्या हाती अर्थव्यवस्था असुरक्षित

पुणे : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सर्वात तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशाला विज्ञान-तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान देतानाच आर्थिक धोरणे राबविली. ज्यामुळे स्वतंत्र भारताचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला. जागतिक मंदीतही भारतीय अर्थव्यवस्था टिकून राहिली. मात्र, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे, भ्रष्टाचाराबाबतची भूमिका आणि केवळ घोषणांचा पाऊस पाडणे यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट होत आहे.

तीच परिस्थिती राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आहे. येणाऱ्या निवडणुकांना मोदी हुकूमशाही पद्धतीने आणि धार्मिक ध्रुवीकरण, साम-दाम-दंड, पैशाचा व तपास संस्थांचा वापर या मार्गाने सामोरे जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकंदरीत सद्यस्थिती पाहता मोदी आणि फडणवीस यांच्या हातात अर्थव्यवस्था सुरक्षित नाही, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

राजीव गांधी स्मारक समिती आणि पुणे शहर-जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने भारतरत्न स्व. राजीव गांधी जयंती सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ‘देशापुढील आर्थिक आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. टिळक स्मारक मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर, शहराध्यक्ष रमेश बागवे, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, माजी आमदार मोहन जोशी, समितीचे अध्यक्ष गोपाळ तिवारी, आमदार शरद रणपिसे, कॉंग्रेस नेते बाळासाहेब शिववरकर, अभय छाजेड, सोनाली मारणे, राजीव जगताप, सूर्यकांत मारणे, नंदूशेठ पापळ, विवेक भरगुडे, महेश अंबिके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राजीव गांधींनी आपल्या कारकीर्दीत अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचा पाया घातला. त्यांनी उद्योगांना कर लावल्याने महसुलात ४० टक्के वाढ झाली. कंप्युटर आणि तंत्रज्ञान उद्योगासाठीचे लायसन्स राज रद्द केले. त्यांनी लघुउद्योग धोरण पहिल्यांदा सुरू केले. परिणामी १९८८ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर १०.२ टक्केपर्यंत वाढला. सध्याच्या सरकारने नियोजन आयोग, पंचवार्षिक योजना रद्द केली आहे. त्याजागी निती आयोग आणला. मात्र तो काय करतो हे कोणालाच ठाऊक नाही. आर्थिक विकास मोजण्याची पद्धत बदलली. त्यामुळे खरी अर्थव्यवस्था कळणे अवघड आहे. नोटबंदी आणि जीएसटी यांसारख्या चुकीच्या धोरणी निर्णयामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आलेले हे मोदी सरकारच खऱ्या अर्थाने भ्रष्टाचारी असल्याची अनेक उदाहरणे गेल्या चार वर्षात दिसली आहेत. त्यामुळे या भ्रष्टाचारी आणि हुकूमशाही राजवटीला हद्दपार करणे गरजेचे आहे.

राज्यातही तशीच परिस्थिती असून, आर्थिक विकासदर फडणवीस सरकार आल्यापासून सतत घसरत आहे. गुजरातचा सरासरी विकासदर १०, बिहार ९.५ , मध्यप्रदेश ८.१, कर्नाटक ७.८, महाराष्ट्र ७.३ आहे. ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आहे. औद्योगीत विकास दरातही राज्य घसरत आहे. व्यापार यादीत राज्य १३ व्या स्थानी गेले आहे. आघाडी सरकारच्या काळात राज्यात आणलेल्या पाच मोठ्या प्रकल्पाना सत्तांतर झाल्यावर दुर्लक्षित केले आहे. कृषीचा विकासदर जैसे थेच आहे. सरकारचे नियंत्रण सुटले आहे. शेतकरी मरतो आहे. हे बदलायचे असेल, तर कृषी मुल्य आयोगाला वैधानीक दर्जा देणे गरजेचे आहे. हायपरलुप, बुलेट ट्रेन हा भंपकपणा आहे. राज्यात अनेक समस्या आहेत. त्यावर केंद्र आणि राज्य सरकारकडून काहीही उपाययोजना केल्या जात नाहीत. केवळ मूठभर भांडवलदारांची चापलुसी करताना हे सरकार दिसत आहे. या धोरणामुळे येत्या काळात देश आणखी बिकट परिस्थितीत जाऊ शकतो, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.

‘राजीव गांधी नंतरचा भारत’ या विषयावर मार्गदर्शन करताना कुमार केतकर म्हणाले, राजीव गांधी यांच्या धोरणात्मक निर्णयामुळे देशात संगणक क्रांती झाली. संगणकामुळे देशात बेकारी येईल, असे म्हणणारे आज संगणक क्रांती आपणच केल्याचा आविर्भाव आणत आहेत. सध्या देशाची विविध धोरणे ट्विटर व व्हाट्सअॅपवर सांगण्याची पद्धत सुरू झाली आहे. नवतंत्रज्ञान क्रांतीची सुरूवात राजीव गांधी यांनी केली. मात्र, त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. ही क्रांती तेव्हा झाली नसती, तर आज जगात आपणास काहीच किंमत मिळाली नसती. मोदींप्रमाणे सुशिक्षीतांचाही भुगोल आणि इतिहास कच्चे आहे. हे सर्व वाट्पऑप युनिव्हर्सिटीचे आहेत. ही फळी भारताने पुन्हा हिंदु राष्ट्र आणि सशस्त्र राष्ट्र व्हावे, असे वाटते. मोदींच्या परदेश दौऱ्यावर जेवढा खर्च झाला, तेवढी परदेशी गुंतवणुक सुद्धा देशात झाली नाही. आपण सुशिक्षीत केलेल्या समाजाला पुन्हा सुशिक्षीत करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, राजीव गांधी यांनी संधी दिल्याने मी २६ व्या वर्षी खासदार झालो. राहुल गांधीही आज युवकांना संधी देण्याचे काम करत आहेत. राजीव गांधी हे देशाला आधुनिकतेकडे घेऊन जाणारे पंतप्रधान होते. सध्या देशात केवळ घोषणांचा कारखानाच सुरू आहे. सामान्य माणसाला विकासदर कळत नाही. सामान्य लोक संभ्रमात आहेत. काय खरं आणि काय खोटे हे कळत नाही. कृषी, शिक्षण, व्यापार आणि रोजगार या क्षेत्राची मोदी सरकारने वाट लावली आहे. आघाडी सरकारच्याच काळात असलेल्या योजना नावे बदलून पुढे चालू ठेवल्या आहेत. केंद्रातले आणि राज्यातले सरकार कर्तव्यशून्य असून, केवळ बड्या उद्योगपतींच्या जीवावर चालणारे आणि त्यांच्यासाठी सरकारी संपत्तीचा वापर करणारे हे सरकार बदलण्यासाठी आपल्या सगळ्यांना मैदानात उतरावे लागेल.

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांचा केरळातील पूरग्रस्तांना मदतीचा हात