fbpx

महिला बचतगटांच्या वस्तू विक्री, प्रदर्शनासाठी जागा उपलब्ध करुन देणार – चंद्रकांत पाटील

chandrakant patil

जळगाव – महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होण्यास मोठया प्रमाणात मदत होत असल्याने या बचतगटांच्या वस्तुंची ग्रामीण भागात विक्री वाढावी व या वस्तुंचे प्रदर्शन करता यावे. यासाठी त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव तयार करावा, अशा सुचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. भरारी फाउंडेशन आयोजित महिला बचत गटांचा खान्देशातील सर्वात मोठा महोत्सव असलेल्या बहिणाबाई महोत्सवाचे उद्घाटन येथील सागरपार्क मैदानावर पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये समाजात सकारात्मक वातावरण तयार होत आहे. या वातावरणामुळे समाजात चांगले उपक्रम घडत आहे. चांगल्या उपक्रमांना आर्थिक पाठबळही चांगल्याप्रकारे उपलब्ध होत असल्याने या उपक्रमांतून समाजहिताचे काम अधिक जोमाने होण्यास मदत होईल. भरारी फाऊंडेशन गेल्या चार वर्षापासून महिला बचतगटांसाठी राबवित असलेला हा महोत्सव याच चांगल्या उपक्रमाचा भाग असल्याचे गौरोवोद्गारही पालकमंत्र्यांनी यावेळी काढले. त्याचबरोबर बहिणाबाई पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या पुरस्कारार्थींच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक कार्याची समाजाला ओळख होऊन त्यांचे कार्य समाजासमोर येते. बचतगटांची मोठी साखळी राज्यात तयार झाली असून यामाध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होत असल्याने शासन या बचतगटांना सर्वोतोपरी मदत करील असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी चैत्राम पवार, गौरी सावंत, वासंती दिघे (सामाजिक) शाहीर शिवाजी पाटील (सांस्कृतिक) शीतल महाजन (क्रीडा) हर्षल विभांडीक (शिक्षण) हेमाताई अमळकर (महिला सक्षमीकरण) डॉ. एस. एस. राणे, गोपाळ चव्हाण (शैक्षणिक) माया धुप्पड (साहित्य) या मान्यवरांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना बहिणाबाई पुरस्काराने पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सुरुवातीस पालकमंत्र्यांच्या हस्ते फीत कापून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन व बहिणाबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाहिर शिवाजी पाटील यांच्या टीमने राष्ट्र जागरण गीत गायले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी या महोत्सवाच्या आयोजना मागील भूमिका विशद केली.