महानगरपालिका हद्दीत समाविष्ट गावांना त्वरीत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात- शिवतारे

पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांना नागरी सुविधा त्वरीत उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी सुचना जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली.आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, फुरसूंगी, देवाची उरळी येथील विकासकामांबाबत श्री. शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली व्ही व्ही आय पी सर्कीट हाऊस, पुणे येथे आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. श्री. शिवतारे म्हणाले, नव्याने समाविष्ट झालेल्या या गावांमध्ये अंतर्गत रस्त्यांची कामे, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन आदी कामे गतीने होणे आवश्यक आहे. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने कचरा व्यवस्थापन तसेच सांडपाणी वाहून जाण्यासाठी बंदीस्त गटारे बांधावीत. या भागातील ॲमिनिटी स्पेस मध्ये मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण तयार करणे, जॉगिंग ट्रॅक बनविणे तसेच डायलेसिस केंद्र तयार करणे आवश्यक आहे. या कामांसाठी आमदार निधीतून तरतुद करण्यात येईल. या कामांची सुरुवात तात्काळ करुन ही कामे गतीने मार्गी लावावीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

shivtare1

आंबेगाव खुर्द व आंबेगाव पठार या भागात असणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई दुर होण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच या भागात झालेल्या बांधकामांची पाहणी करुन अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करावी, अशा सुचना त्यांनी संबधित विभागांच्या अधिका-यांना केल्या. तसेच अपुर्ण कामे तात्काळ पुर्ण करण्याबरोबरच मंजूर कामे त्वरीत सुरु करावीत, असे सांगून या भागातील समस्या व विकास कामांच्या सद्यस्थितीबाबत पुणे महानगरपालिकेमध्ये लवकरच बैठक घेऊन सविस्तर आढावा घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

You might also like
Comments
Loading...