बेरोजगार युवकांना त्वरीत कर्ज उपलब्ध करुन द्या, राज्यमंत्री बच्चू कडू यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

बेरोजगार युवकांना त्वरीत कर्ज उपलब्ध करुन द्या, राज्यमंत्री बच्चू कडू यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

BACCHU KADU

परभणी : जिल्ह्यामध्ये औद्योगिक विकास न झाल्याने बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी पुढे येणाऱ्या शिक्षित युवकांना आर्थिक विकास महामंडळाद्वारे मंजूर होणारे कर्ज राष्ट्रीयकृत बँकेद्वारे दिले जात नाही. शासकीय निर्देशानुसार या आर्थिक विकास महामंडळाने मंजूर केलेले कर्ज प्रकरणे राष्ट्रीयकृत बँकेने देणे आवश्यक आहे. त्यासाठी सूचना द्याव्यात या संबंधीचे पत्र राज्यमंत्री बच्चू कडू यांनी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.

जिल्हयातील कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ मर्यादीत, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चमोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादीत मुंबई, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादीत, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा उद्योग केंद्र यांच्याद्वारे मंजूर झालेल्या कर्ज प्रकरणांना राष्ट्रीयकृत बँकेद्वारे जाणिवपूर्वक टाळले जाते. यामुळे जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वतःचा व्यवसाय व उद्योग उभे करण्यासाठी आडचणी येत आहेत. या बाबत जिल्ह्यातील अनेक बेरोजगार तरुणांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारी बाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह राज्यमंत्री बच्चु कडु यांची अकोला येथे भेट घेऊन या बाबत तक्रारीचे पत्र दिले होते.

तक्रारीतील गांभीर्य विचारात घेत राज्यमंत्री बच्चु कडू यांनी परभणीच्या जिल्हाधिकारी यांना आर्थिक महामंडळाद्वारे बेरोजगार युवकांना मंजुर झालेल्या कर्जास राष्ट्रीयकृत बँकांद्वारे त्वरीत कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी लेखी सूचना पत्राद्वारे दिली आहे. या मुळे जिल्हातील वेगवेगळ्या घटकातील तरुणांना व्यवसाय व उद्योग उभारणी साठी कर्ज मिळण्यात मदत होईल. या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बाळासाहेब तरवटे, युवा आघाडी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण, शेतकरी आघाडी तालुका प्रमुख नारायण ढगे, मिडिया प्रभारी नकुल होगे आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या