‘ते’ आरोप सिध्द करा किंवा माफी मागा, अन्यथा भाजपला उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही’

‘ते’ आरोप सिध्द करा किंवा माफी मागा, अन्यथा भाजपला उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही’

raju vaidya

औरंगाबाद : गुंठेवारी नियमितीकरणासाठी रहिवासी, व्यापाऱ्यांना धमकावले जात आहे. पालकमंत्र्यांची व्हिडिओ क्लिप आपल्याकडे असून ते धमकावण्याचा सपाटा लावीत आहेत. पालकमंत्री सुभाष देसाई वसुलीदार तर महापालिका आयुक्त पांडेय व्यवस्थापक असल्याची टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी मंगळवारी केली होती. विधानसभा संघटक राजू वैद्य यांनी सुद्धा आता भाजपला वसुलीचे पुरावे द्या अन्यथा माफी मागा असा इशाराच दिला आहे. भाजपने वसुलीचे पुरावे देऊन आरोप सिध्द करावेत, नसता शिवसेनेची जाहीर माफी मागावी, अन्यथा भाजपाला उघडे पाडल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा राजू वैद्य यांनी दिला.

ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरगरीबांची अनाधिकृत घरे अधिकृत व्हावीत यासाठी गुंठेवारी कायदा मंजूर करून डिसेंबर २०२० पर्यंतची घरे नियमीत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळेच भाजप उठसुठ शिवसेनेवर अशा प्रकारचे आरोप करीत असल्याची टीका त्यांनी केली. शहरातील सर्वसामान्य हातावर पोट असणारे नागरिक गुंठेवारी भागात राहतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही सोयी, सुविधा पूर्वी पुरविता येत नव्हत्या. शिवसेनेने पुढाकार घेऊन मनपातर्फे सुविधा दिल्या. सुरुवातीला या भागात विद्युत व्यवस्था नव्हती. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत खैरे यांनी पुढाकार घेऊन याठिकाणी लाईट आणली. त्याचबरोबर मी सभापती असतांना या भागातील पाणीपुरवठा सुरळीत केला. हे जनतेला माहिती आहे.

गुंठेवारीतील अनाधिकृत घरे नियमीत करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय शिवसेनेने घेतला. या निर्णयामुळे लाखो गरिबांची घरे नियमीत होऊन त्यांना मालकीहक्क मिळणार आहे. गुंठेवारीतील घरे नियमीत होत असल्याने नागरिकांना आनंद असून त्यांनी शिवसेनेचे आभार मानत आहेत यामुळेच भाजपला पोटशूळ उठले आहे. भाजप शहर अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत शिवसेना गुंठेवारीतील वसुली करत असल्याचा आरोप केला. या आरोपाचा मी तीव्र निषेध करतो. शिवसेनेने केलेल्या प्रयत्नामुळेच गोरगरीबांची अनधिकृत घरे नियमीत होत आहेत असे राजू वैद्य यांनी सांगितले.

काय म्हणाले होते भाजपचे केणेकर?

गुंठेवारी नियमितीकरणासाठी रहिवासी, व्यापाऱ्यांना धमकावले जात आहे. पालकमंत्र्यांची व्हिडिओ क्लिप आपल्याकडे असून ते सर्वसामान्यांना धमकावण्याचा सपाटा लावीत आहेत. पालकमंत्री सुभाष देसाई वसुलीदार तर महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय व्यवस्थापक असल्याची टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली होती.

महत्त्वाच्या बातम्या