अभिमानास्पद!  महाराष्ट्र संघात स्थान मिळवणारा औरंगाबादचा पहिला खेळाडू ठरला साई अंबेकर

sai ambekar

औरंगाबाद : सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेत १६ वर्षाखालील वयोगटात १४ किमी टाइम ट्रायल सायकलिंग स्पर्धेत औरंगाबादच्या साई अंबेची निवड झाली आहे. १२ सप्टेंबर रोजी रविवारी ही चाचणी सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग येथे घेण्यात आली होती. या चाचणीत पात्र ठरणारा साई हा औरंगाबादचा पहिला खेळाडू ठरला असून त्याने चाचणीत दुसारा क्रमांक पटकावला आहे. शहरात खेळासाठी अनुकूल वातावरण नसतांनाही शहरातील विविध खेळाडू चांगली कामगिरी बजावतांना दिसत आहे.

शहरात अनेक गुणवंत खेळाडू आहेत. जे क्रीडा विश्वात चांगली कामगिरी बजावू शकतात. मात्र अंतर्गत राजकारणाचा बळी यामुळे विद्यार्थ्यांना शहरात संधी मिळतांना दिसत नाही. नुकतेच औरंगाबादसाठी जाहीर झालेले क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलविण्यात आले. शहरातील क्रीडा विश्वाचे आणि विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. साई अंबेकर विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. सरावासाठी घेतलेल्या पाच लाखांच्या सायकलचे हप्ते गेल्या वर्षभरापासून त्यांची कुटुंबे फेडत आहेत. राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंसाठी दीड लाखांपासून ते १५ लाख रुपयांपर्यंत सायकलच्या किंमती असतात.

साई हा शहरातील भास्कराचार्य प्रतिष्ठान चाटे स्कूलमध्ये दहावीत शिकणारा विद्यार्थी आहे. स्पर्धेतील हे अंतर त्याने २१ मिनिटात २७ सेकंदात पार पाडले आणि स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. पुण्याच्या वीरेंद्र पाटील याने २१ मिनिट १३ सेकंदात प्रथम क्रमांक मिळवला. पुण्याच्या आदिप वाघ याने २१ मिनिट २८ सेकंदात हे अंतर पार करत तृतीय स्थान मिळवले. या वयोगटासाठी आणखी एक निवड चाचणी होईल. त्यानंतर या वयोगटातील एकूण सहा खेळाडूंची निवड महाराष्ट्र संघासाठी केली जाईल, असे साईचे प्रशिक्षक व वडील भिकन अंबे यांनी सांगितले. या निवड चाचणीत बाजी मारल्यानंतर साई २६ व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या