अभिमानास्पद ! राज्यातील ५७ शूर पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाचा सन्मान

maharashtra police

मुंबई : उद्या २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन ! उद्या देशातील ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. विविध प्रकारच्या शूर, देशहितासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींसोबतच अनेक क्षेत्रातील दिग्गजांना देशातील महत्वाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विविध सन्मानांसाठी नावांची घोषणा करण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते.अभिमानास्पद बाब म्हणजे राज्यातील तब्बल ५७ पोलीस अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून अधिक माहिती दिली आहे. ‘शौर्य, कर्तबगारीमध्ये महाराष्ट्र पोलीस नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यामुळेच आपल्या पोलिसांनी गणराज्यदिनी १३ शौर्य पदके, विशेष सेवेची ४ पदके तर गुणवत्तापूर्ण सेवेबद्दलची ४० पदके पटकावली आहेत. खास सेवेसाठी एकूण ५७ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झाले आहे.’

‘पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख नात्याने या सर्वांचा मला सार्थ अभिमान वाटतो. सर्व सन्मानित पोलीस अधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन! तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!’ असं ट्विट अनिल देशमुख यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या