पद्मावत विरोध : गुंडांनी केलेल्या हल्ल्यानंतर घाबरलेल्या विद्यार्थ्यांचा व्हिडीओ व्हायरल

स्कूलबसवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध

टीम महाराष्ट्र देशा- गुरुग्राममध्ये करणीच्या गुंडांनी अक्षरशः कहर केला. शाळेतून घरी परतणाऱ्या चिमुरड्यांच्या स्कूलबसवर तुफान दगडफेक केली. गुरुग्राममधील जीडी गोयंका वर्ल्ड शाळेतील मुलं बुधवारी संध्याकाळी घरी येत होती. त्यावेळी अचानक करणी सेनेच्या 60 गुंडांनी स्कूलबसचालकाला बस थांबवायला सांगितलं. ड्रायव्हरने दुर्लक्ष करत गाडी सुरुच ठेवल्याने गुंडांनी दगडफेक सुरु केली. बसच्या काचा फुटल्या, मात्र शिक्षकांनी बस पुढेच जाऊ देण्याचं ड्रायव्हरला बजावलं.

ही बस शाळेच्या आवारातून बाहेर पडल्यानंतर लगेचच एका जमावाने बसवर हल्ला चढवला. जमावाने दगड आणि काठ्यांनी बसच्या खिडकीच्या काचा फोडल्या. यामुळे बसमधील मुले प्रचंड घाबरली होती. मात्र, बसमधील शिक्षकांनी प्रसंगावधान दाखवत सर्व मुलांना सीटच्या खाली लपायला सांगितले. या बसमधील एक विद्यार्थी तर अवघा चार वर्षांचा होता. साहजिकच या हल्ल्यामुळे अनेक मुले घाबरली होती. या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यास अनेक मुले हा प्रकार सुरू असताना रडत असल्याचे दिसत आहे. या संतापजनक प्रकारानंतर सर्वच स्तरातून आता निषेध व्यक्त होऊ लागला आहे.

You might also like
Comments
Loading...