करमाळा बाजार समिती निवडणूक : प्रचार संपला; आता मतदानाची प्रतीक्षा

करमाळा/गौरव मोरे – करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा प्रचार संपला असून आता सर्वांना मतदानाची प्रतिक्षा असून उद्या रविवार दि. ९ सप्टेंबरला मतदान होणार आहे.

करमाळा बाजार समिती निवडणूकीतला सुवर्णकाळ काही तासांवर येऊन ठेपलेला असून तालुक्यातील शेतकरी मतदार गेल्या काही दिवसांपासून ऐकत असलेले तालुक्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप, टीका, आश्वासनांची खैरात हे सर्व राजकीय महाभारत काल रात्री पासून बंद झालेले असून आज दिवसभर आणि रात्री ‘लक्ष्मीचा’ संचार सुरू राहील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक १८ जागांसाठी होत आहे याअगोदर व्यापारी मतदारसंघातून दोन जागा आणि हमाल / तोलार मतदारसंघातून एक जागा बिनविरोध झालेली आहे. १५ जागांसाठी उद्या रविवारी मतदान होणार आहे प्रथमच शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार मिळालेला असल्यामुळे याचा परिणाम बरोबर एक वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत दिसून येणार आहे.

एकूण १ लाख १४ हजार २०३ मतदारांचा समावेश करण्यात आलेला असून ही निवडणूक पाटील-जगताप युती तसेच बागल गट आणि शिंदे गट यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. ह्या निवडणूकीत बाजी मारण्यासाठी तिन्ही गटांचा नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीका तसेच आश्वासनांची खैरात करून गेले काही दिवसांपासून तालुक्यातील वातावरण चांगलेच तापवलेले आहे. या निवडणूकीत आपणच जिंकणार यासाठी रस्सीखेच सुरू होती, काल प्रचार संपला आणि उद्या मतदान होणार असून ११ सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या निवडणूकीच्या रणधुमाळीत मतदार राजा जसा प्रचार संपला तसा लक्ष्मीलाच शोधायला पळत सुटल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्यातरी सर्वच गटांकडून जोरदार तयारी सुरू असून या निवडणूकीत नक्की कोण बाजी मारणार हे ११ सप्टेंबरलाच समजेल.

You might also like
Comments
Loading...