विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या ‘त्या’ नराधम प्राध्यापकाला अटक

टीम महाराष्ट्र देशा- विद्येचं माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुणे शहरात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पुण्यातील वडगाव परिसरातील एका महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकाने विद्यार्थिनीला पास करण्यासाठी चक्क शरीरसुखाची मागणी केल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या नराधम प्राध्यापकाला पोलीसांनी अटक केली आहे.

संदीप कांबळे ( रा, वडगाव पठार. पुणे) असे शिक्षकाचे नाव असून त्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव बुद्रुक भागामध्ये असणाऱ्या श्री शिव छत्रपती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात हा सर्व प्रकार घडला आहे. दरम्यान या घटनेच्या बातमीनंतर वडगाव बुद्रुक येथील श्री शिव छत्रपती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने त्या नराधम शिक्षकाला निलंबित केले आहे. यासबंधी माहिती संस्थेचे अध्यक्ष विकास दांगट यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना दिली आहे.

संबंधित विद्यार्थिनी या महाविद्यालयात एफ.वाय.बी.ए. वर्गामध्ये शिकत आहे. संदीप कांबळे हा विद्यार्थिनीला फोन करून ‘तुला पास व्हायचं असेल तर आपण एका लॉजवर जाऊ, मग मी तुला पास करतो’ म्हणून फोन करत होता. शिक्षकाच्या अशा मागणीने घाबरलेल्या विद्यार्थिनीने याची माहिती आई-वडिलांना दिली. कुटुंबीयांनी पालकसंघटनेचे शिवा पासलकर यांच्याशी संपर्क साधत त्यांना सर्व घटना सांगितली. त्यानंतर आता हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाईकर करत आहेत.