लातूरामध्ये वृक्षलागवडीतून ऑक्सिजन झोनची निर्मिती

टीम महाराष्ट्र देशा : शहरात वृक्षलागवड व वृक्ष संगोपनाबरोबरच नागरिकांमध्ये झाडांबद्दल आपुलकी व निसर्गाबद्दल संवेदना, निसर्गाबद्दल प्रेम निर्माण करण्याचे कार्य मागील पाच-सहा वर्षांपासून लातूर वृक्ष चळवळीच्या वतीने करण्यात येत आहे. जुलैमध्ये लातूर वृक्ष चळवळीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आयटीआय महाविद्यालयाच्या खुल्या प्रांगणाच्या कंपाउंडभोवती एक हजार कडुनिंबाची झाडे लावून ऑक्सिजन झोनची निर्मिती करण्यात आली आहे.

लातूर वृक्ष चळवळीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून शहरात वृक्षलागवडीसंदर्भात मोठे काम केले जात आहे. आयटीआय परिसरात मोकळी जागा होती. म्हणून लातूर वृक्षच्या महिला सदस्यांनी मेहनत घेऊन एका ऑक्सिजन झोनची योजना आखली. डोक्याच्या उंचीएवढे गवत होते, तीन-चार दिवस या महिला सदस्यांनी मेहनत घेऊन श्रमदान करून गवत काढून घेतले.

एक हजार झाडे लावून ऑक्सिजन झोन तयार केला. यात आज 100 झाडे लावली. हे सर्व कार्य करण्यासाठी लातूर वृक्ष चळवळीत लातूर महिला पोलिस, आयटीआयचे प्राध्यापक, विद्यार्थी, वकील, विद्यापीठ उपकेंद्र, एमएसडब्ल्यूचे विद्यार्थी, बालभवनचे सदस्य यांनी श्रमदान केले. श्रमदानाद्वारे खड्डे करणे, झाड लावणे, आळे करणे, पाणी देणे, बांबूचा आधार देणे हे कार्य केले.

सकाळी याची सुरवात जिल्हा विधी प्राधिकरणच्या सचिव श्रीमती कंकणवाडी, आयटीआय महाविद्यालयाच्या प्राचार्य बोरुळकर, लातूर वृक्ष महिला टीमच्या सुनंदा जगताप, बालभवनच्या प्रतिभा गोमसाळे, विद्यापीठ उपकेंद्र सामाजिक शास्त्र विभागाचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघचे डॉ. बी. आर. पाटील, रोटरी क्लबचे डॉ. भास्कर बोरगावकर, नारी प्रबोधन मंचच्या अनुराधा देऊळगावकर, अजय कलशेट्टी यांच्या हस्ते वड, पिंपळ, कडुनिंब, करंज, चिंच, उंबर, बोर, आवळा वृक्ष लावून सुरवात केली.
या ऑक्सिजन झोनसाठी पहाटे पासूनच शहरातील महिला पोलिस कर्मचारी, शहरातील वृक्षप्रेमी नागरिक, वृक्षप्रेमी विद्यार्थी, लातूर वृक्ष सदस्य, लातूर वृक्ष महिला सदस्य जवळपास 300 वृक्षप्रेमी आले होते.

याकरिता समन्वयक सुपर्ण जगताप, डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, अमृत सोनवणे, हेमंत रामढवे, डॉ. नेताजी शिंगटे, पद्माकर बागल, प्रा. गोरे, नामदेव सुब्बनवाड, तुकाराम घनवटे, एनएसजी कंमाडो जयवंत भालेराव, डॉ. नंदकुमार डोळे, प्रा. संजीवनी गोरे, पूजा तिपनबोने, शुभम जाधव, केदार कुलकर्णी, आदित्य गिरी, एम. एस. जगताप यांनी पुढाकार घेतला.

महत्वाच्या बातम्या