हडको येथे ओल्या कच-यापासून होणार खतनिर्मिती

औरंगाबाद-  हडको येथील आठ वॉर्डातील ओल्या कच-यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अर्ध्या जागेवर खत निर्मिती केली जाणार आहे. परिसरातील वॉर्डातील ओला कचरा येथे आणून त्यावर प्रक्रिया केली जाईल. हडकोच्या वॉर्डातील कचरा नारेगाव येथे वाहून नेण्याचा मनपाचा मोठा खर्च वाचणार आहे.

या प्रकल्पामध्ये उपमहापौर विजय औताडे यांनी पुढाकार घेतला आहे. बाजार समितीचे सभापती रामकिशन पठाडे मालमत्ता कर, अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी मनपात आले होते. महापौर नंदकुमार घोडेले यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी उपमहापौर औताडे यांची भेट घेतली. त्यात बाजार समितीत निर्माण होणा-या भाजीपाल्याच्या कच-यावर चर्चा झाली.

बाजार समितीची परिसरात दीडशे एकर जमीन आहे. तेथेच कच-यावर प्रक्रिया केली तर समितीचा ताण वाचेल. आजूबाजूच्या वॉर्डातील कच-यावरही तेथे प्रक्रिया करता येईल, अशी सूचना औताडे यांनी केली. त्यासाठी बाजार समितीने मनपाला जागा द्यावी, अशी मागणी केली. वॉर्ड समितीत निर्माण होणा-या कच-यावर प्रक्रियेसाठी अर्धा एकर जागा पुरेशी असल्याचे म्हटले जाते.

You might also like
Comments
Loading...