बहुदा रावसाहेब दानवे यांनाच शिवसेनेत यायचं असेल; ठाकरेंच्या ‘भावी सहकारी’बाबत भुजबळांचा तर्क

raosaheb danave vs bhujbal

मुंबई : ‘मंचावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी,’ असं विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहिले. यासोबतच, येणारा काळच काय ते ठरवेल, असं सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यामुळे भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे एकाच मंचावर आले होते. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या भाषणामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून आता विविध नेते प्रतिक्रिया देत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील याबाबत भाष्य केलं असून त्यांनी रावसाहेब दानवे यांना खोचक टोला लगावला आहे. ‘बहुदा दानवे शिवसेनेत येणार असतील तर?’ असा सवाल उपस्थित करत भुजबळ यांनी दानवे यांना टोमणा मारला आहे. तर, ‘काँग्रेस, राष्ट्रवादीचा काहीही त्रास मुख्यमंत्र्यांना नाही. उलट मागील 5 वर्ष भाजपाने शिवसेनेला कशी वागणूक दिली सगळ्यांना माहित आहे. केंद्र सरकारमध्ये शिवसेनेला दिलेले मंत्रीपद आणि केलेली अवहेलनाही पाहिली,’ अशी टिपण्णी देखील भुजबळ यांनी करत युतीच्या शक्यता फेटाळून लावल्या.

महत्त्वाच्या बातम्या