fbpx

‘प्रियांका गांधींचं प्रमोशन हे राहुल यांच्या नाकर्तेपणाची जाहीर कबुलीच आहे’

टीम महाराष्ट्र देशा- घराणेशाही आणि कॉंग्रेस याचं तस जूनचं नात आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या पाठोपाठ प्रियांका गांधी वाड्रा देखील सक्रीय राजकारणात दिसणार आहेत. त्यांच्यावर पक्षाने उत्तरप्रदेशच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे. प्रियांका गांधी वाड्रा यांची सरचिटणीसपदी नियुक्ती केल्यामुळे गांधी कुटुंबाचे समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आता याच घराणेशाहीच्या मुद्द्यावरून भाजपने कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे.

‘राहुल गांधी हे नापास झाल्यानंच काँग्रेसला प्रियांकांचा आधार घ्यावा लागला आहे. राहुल यांच्या नाकर्तेपणाची ही जाहीर कबुलीच आहे,’ अशी टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. कोणत्याही राज्यातील प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी आघाडी करण्यास इच्छुक नसल्यानं काँग्रेस पुन्हा गांधी कुटुंबातच कुबड्यांचा आधार शोधत आहे. नेहरू, इंदिरा, राजीव, सोनिया, राहुल यांच्यानंतर आता प्रियांका गांधींचं प्रमोशन करण्यात आलंय,’ असं पात्रा म्हणाले.

काँग्रेसला घराणेशाहीच्या बाहेर पडणे अशक्य आहे, हे या निर्णयातून दिसून आले आहे. राहुल गांधी यांनी मुद्दामच प्रियांका यांना कनिष्ठ पद दिले आहे. प्रियांका यांना मोठे पद दिल्यास आपले महत्त्व कमी होईल अशी भीती राहुल यांना असल्यानेच त्यांनी प्रियांका यांना मोठे आणि जबाबदारीचे पद दिले नाही, असा आरोप बिहारचे आरोग्यमंत्री आणि भाजपनेते मंगल पांडे यांनी केला.