टेलिकॉम कंपन्यांनी एक महिन्यासाठी मोफत इनकमिंग आणि आउटगोईंग कॉल्सची सुविधा द्यावी : कॉंग्रेस

नवी दिल्ली : देशातील सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत स्थलांतरितांच्या मदतीसाठी टेलिकॉम कंपन्यांनी एक महिन्यासाठी मोफत इनकमिंग आणि आउटगोईंग कॉल्सची सुविधा द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी कॉंग्रेसच्या वतीने मोबाईल ऑपरेटर कंपन्यांकडे केली आहे. यासाठी काँग्रेसने मुकशे अंबानी (जिओ), कुमार मंगलम बिर्ला (वोडाफोन-आयडिया), पी. के. पुरुवाल (बीएसएनएल) आणि सुनिल भारती मित्तल (एअरटेल) या टेलिकॉम कंपन्यांच्या प्रमुखांना आवाहन करणारे पत्र लिहिले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे देशातील अनेक कामगार, मजूर पुन्हा आपापल्या गावी परतत आहेत. नोकरी शिक्षणानिमित्त शहरांकडे आलेले लोक वाहन नसल्यामुळे पायीच शहरांमधून गावांकडे स्थलांतर करत आहेत. दरम्यान, आता त्यांच्याकडील संपर्काचे एकमेव साधन असलेल्या मोबाईलमधील बॅलन्सही संपल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी एक महिन्यासाठी मोफत कॉलिंगची सुविधा द्यावी, अशी मागणी प्रियंका गांधी यांनी टेलिकॉम कंपन्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

लॉकडाऊनमुळे देशात सध्या सर्व उद्योग आणि व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे कामाच्या शोधात मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झालेले लोक पुन्हा आपल्या गावांकडे पायी जायला निघाले आहेत. या लोकांकडे ना अन्नपाण्याची सोय आहे ना राहण्याची, अशातच आता त्यांच्याकडे संपर्काचे साधन असलेल्या मोबाईलचा बॅलन्सही संपला आहे. यावर काँग्रेस नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, जे लोक शहरातून गावाकडे निघाले आहेत त्यांच्यासाठी सरकारने गाड्या सुरू कराव्यात. मजूर लोक गाड्या नसल्याने चालत निघाले आहेत. त्यांच्यासोबत लहान मुलेही आहेत. त्यांना त्यांच्या गावी जायला गाड्यांची सोय करावी,"अशी मागणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.

हेही पहा –