खाजगी संस्थाचालकाच अपहरण, आमदार अमित देशमुख पडले तोंडघशी

टीम महाराष्ट्र देशा- लातूरमध्ये खासगी शिकवणी चालवणाऱ्या प्राध्यापकाचे अपहरण करुन २५ लाखांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक सचिन मस्केसह लातूर खासदारकीची काँग्रेसकडे उमेदवारी मागणारे व्ही.एस.पँथरचे अध्यक्ष विनोद खटके,लातूर महापालिकेचे स्विकृत नगरसेवक पुनीत पाटील आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लातुरातील शिकवणी चालक अविनाश चव्हाण हत्या होऊन काही दिवसच उलटले आहेत. त्याप्रकरणात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांचा माजी अंगरक्षक असणाऱ्या व्यक्तीने सुपारी घेतल्याची चर्चा राज्यभर झाली होती. त्यावेळी अविनाश चव्हाण खूनप्रकरणानंतर लागलीच लातूरात काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन लातूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढलेले होते. खंडणीचे प्रकार वाढलेले आहेत अशी टिका करुन पोलीस कारवाई करीत नाहीत असा आरोपही केला होता. मात्र आता काँग्रेसचे दोन नगरसेवकच खंडणीच्या गुन्ह्यात अडकले आहेत. लातूर शहर आणि जिल्ह्यात या घटनेने खळबळ उडाली आहे.

शहरात परप्रांतातून शिकवणी चालवण्यासाठी आलेले प्राध्यापक विजयसिंह हर्षप्रतापसिंह परिहार आणि त्यांचे सहकारी प्राध्यापक राजीव तिवारी यांच्याकडे दरमहा खंडणी मागितली जात असल्याचा आरोप केला आहे.यापूर्वी आम्ही ६ लाख ६६ हजार रुपये दिले असल्याचे त्यांनी सांगितले.त्यानंतर आरोपी पुन्हा २५ लाख रुपयांची खंडणी मागत होते.ही रक्कम देण्यासाठी परिहार आणि तिवारींना जबरदस्तीने उचलून नेत मारहाण केल्याचे सबळ पुरावे पोलिसांकडे अस़ल्याची माहिती आहे. याप्रकरणी धाडसाने परिहार यांनी शहर पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांना सांगितले व लातूर पोलिसात तक्रार केली.त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा नगरसेवक सचिन अशोक म्हस्के यास अटक केली. नगरसेवक पुनित पाटील, व्ही. एस. पँथरचे अध्यक्ष विनोद खटके व इतर तिघे मात्र फरार आहेत. पोलीस अधीक्षक व अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी खंडणीचे प्रकरण उघडकीस आणले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांनी सांगितले.

२५ लाख रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात थेट काँग्रेसच्या नगरसेवकाला याप्रकरणी अटक झाली आहे. हे नगरसेवक आणि संघटना अध्यक्ष स्थानिक आमदारांच्या जवळची मंडळी असल्याने आगामी काळात हे प्रकरण काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना डोकेदुखी ठरणार आहे.