नागपूरमध्ये खासगी मीटर रिडींग एजन्सी महावितरणच्या रडारवर

MSEDCL light meter

नागपूर : वीज ग्राहकांशी संगनमत करुन मीटरचे रिडींग कमी टाकणे, प्रत्यक्ष ग्राहकाकडे न जाता परस्पर मीटर रिडींग टाकणे, यासारख्या अनियमितता करणाऱ्या खासगी एजन्सींच्या १३ मीटर रिडर्सचे आधार कार्ड ब्लॉक करीत महावितरणने या एजन्सींना दणका दिला आहे.

विशेष म्हणजे, या मीटर रिडर्सचे आधार कार्ड सिस्टीममध्ये ब्लॉक केल्याने हे मीटर रिडर्स आता राज्यभरात महावितरणचे मीटर्स रीड करू शकणार नाहीत.

वीज ग्राहकांना चुकीची वीजबीले आणि मीटर रिडींगच्या नोंदीत मोठ्या प्रमाणात अनागोंदी होत असून वीजमीटरचे रीडिंग घेणाऱ्या खासगी एजन्सीज हा घोळ घालत असल्याचा प्रकार लक्षात आल्याने महावितरण प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत त्यांनी घेतलेल्या रिडींगपैकी सरासरी ५ टक्के ग्राहकांच्या रीडिंगचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून “क्रॉस चेकिंग’ ला सुरुवात केली, यात महावितरण कर्मचाऱ्यांनी आणि एजन्सीच्या कर्मचाऱ्याने घेतलेल्या रीडिंगमध्ये तफावत आढळल्याने महावितरण प्रशासनाने ही कठोर कारवाई केली आहे. यापुढे असे प्रकार आढळल्यास संबधित एजन्सीला “ब्लॅक लिस्ट’ करुन आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही सर्व संबंधितांना दिली आहे.

आतापर्यत अशा प्रकरणांत १३ मीटर रिडरवर महावितरणे कारवाई केली असून त्यात त्रिमुर्तीनगर नागपूर उपविभागातील एक, मेहकर उपविभागातील दोन, मंगरुळपीर उपविभागातील एक तर बल्लारशहा उपविभागातील दोन, सडक अर्जुनी उपविभागातील एक, सालेकसा उपविभागातील दोन, गोंदीया शहर उपविभाग आणि गोंदीया ग्रामिण उपविभागातील प्रत्येकी एक, तर गोरेगाव उपविभागातील दोन मीटर रिडरवर महावितरणने कारवाई केल्याने हे तेराही खासगी एजन्सीचे कर्मचारी आता महावितरणमध्ये कुठेही मीटर रिडिंगचे काम करण्यास अपात्र ठरले आहेत.

यापुर्वी एखाद्या मीटर रिडरने त्याच्या कामात चुक केल्यास त्याला त्या कामावरून काढल्या जाई मात्र लगेच दुसऱ्या एजन्सीमार्फ़त तो परत आपले काम करीत असे आणि परत तो पुर्वीच्याच चुका करीत असल्याचे लक्षात आल्याने, महावितरणने सर्व मीटर रीडर्सना आधार क्रमांक बंधनकारक केले होते यामुळे आता एखाद्याने काही गडबड केल्यास त्याचा आधार क्रमांकाची नोंद घेत महावितरणच्या प्रणालीत त्यास ब्लॉक करण्यात येत असल्याने अश्या कर्मचा-यांना मीटर रिंडींगच्या कामापासून दूर ठेवले जाणार आहे. महावितरणने मागिल दोन महिन्यांपासून या एजन्सीजला कामात सुधारणा करण्याच्या सुचना दिल्या असतांनाही अश्या चुका होत असल्याने महावितरणतर्फ़े ही कारवाई करण्यात आली.