प्रवाशांकडून अधिक भाडे आकारल्यास खासगी वाहनांचा परवाना होणार रद्द- दिवाकर रावते

मुंबई : परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रवाशांची होणारी लूट थांबविण्यासाठी खासगी तसेच कंत्राटी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे स्पष्ट केले. यापुढे अधिक भाडे आकारणाऱ्या वाहनाचा परवाना रद्द केला जाणार आहे. सध्या सुट्टीचे दिवस असल्यामुळे खाजगी वाहनांचे भाडे चांगलेच वाढले आहे. त्यामुळे गर्दीच्या हंगामात खाजगी वाहनांना एसटीच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येणार असल्याचे रावते यांनी सांगितले.

शासनाने खासगी तसेच कंत्राटी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात रावते म्हणाले, “राज्यात प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात खासगी बस, ट्रॅव्हल्स इत्यादी कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. गर्दीच्या हंगामामध्ये खासगी वाहतूकदारांकडून बरीच भाडेवाढ करण्यात येते. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत. या खासगी वाहनांना एसटी महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येणार आहे. या निर्णयामुळे गर्दीच्या हंगामाच्या काळात प्रवाशांची अडवणूक करुन केली जाणारी लुबाडणूक थांबविण्यास मदत होईल”