मी मुख्यमंत्र्यांवर टीका केली नाही केवळ सल्ला दिला, पृथ्वीराज चव्हाणांनी दिले स्पष्टीकरण

chavan

मुंबई : कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रशासकीय नेतृत्वाचा अभाव असल्याचं दिसून येते असल्याची प्रतिक्रिया दिली होती. पुण्यातील पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हे मुख्यमंत्री ठाकरेंबाबत भाष्य केले होते.

ते म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात काही भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नियुक्तीसाठी रखडले आहेत. तर काही अधिकाऱ्यांना दोन-दोन कामं दिली आहेत. या अधिकाऱ्यांची योग्य जागी नियुक्ती करणे हे मुख्यमंत्र्यांचे पहिलं काम आहे. अधिकाऱ्यांची योग्यता आणि अनुभव लक्षात घेऊन त्यांना योग्यठिकाणी नियुक्त करावं त्यामुळे राज्याला लाभ होईल. राज्यात १० आयएएस अधिकारी नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांच्याकडे काहीच काम नाही असं त्यांनी सांगितले.

मात्र यावरून राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना सुरवात झाली. यावर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, मी राज्याच्या नेतृत्वावर कोणतीच टीका केली नाही. उलट मी एक सल्ला दिला. साध्यच्या परिस्थितीत लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे. आज अनेक अधिकारी हे रिकामे बसले आहेत. त्यांना पोस्टिंग नाही. अशा अधिकाऱ्यांची लवकरात लवकर नियुक्ती करून त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घ्यावा. लोकप्रतिनिधींना स्थानिक पाताळीवरची परिस्थिती माहित असते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी जुळवून घेऊन काम केले तर ते कार्य अधिक परिणामकारक होते, असे चव्हाण म्हणाले.

दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुरवातीच्या वक्तव्याचा धागा पकडत कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी देखील टीका केली आहे. ते म्हणाले की, मुंबईत कोरोनाचं थैमान पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत ४७ लोकांचा जीव गेला. दर २ तासाला २ मुंबईकरांचा मृत्यू होत आहे. शनिवारी एकाच दिवशी ८८४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. प्रत्येक तासाला ३७ रुग्ण सापडत आहेत. या अपयशाची जबाबदारी कोणी घेईल का? कुणाला तरी बलिदान द्यावं लागेल. मंत्री अथवा बाबू? असं त्यांनी म्हटलं आहे.