दुष्काळात जनतेला मदत व्हावी म्हणून सामुदायिक विवाह सोहळ्याचा महायज्ञ – डॉ. प्रितम मुंडे

परळी : दुष्काळाने जनता हैराण झाली आहे, त्यात केंद्र आणि राज्य सरकार जनतेच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे मात्र या परिस्थितीत मुंडे साहेबांच्या कन्या म्हणून आम्ही शांत बसू शकत नाहीत म्हणुनच परळीत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्वांनी घरचे कार्य समजून सहभागी व्हावे आणि कन्यादानाचे पुण्य मिळवावे असे आवाहन बीडच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी केले.

राज्याच्या ग्राम विकास, महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व खासदार डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या पुढाकाराने गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक २२ फेब्रुवारी रोजी परळीत सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी आज (बुधवारी) वैद्यनाथ कारखाना येथे ऊसतोड मजूर, मुकादम व कर्मचारी यांची बैठक घेऊन सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी माजलगावचे आमदार आर. टी. देशमुख, वैद्यनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, संचालक तथा भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, श्रीहरी मुंडे, पांडुरंगराव फड, परमेश्वरराव फड, ज्ञानोबा मुंडे, आश्रोबा काळे, त्रिंबकराव तांबडे, व्यंकटराव कराड, कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दिक्षीतुलू यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी बोलताना खा. डॉ. प्रितमताई मुंडे म्हणाल्या की, दुष्काळ मोठा आहे, अशा परिस्थितीत राज्य आणि केंद्र सरकार जनतेला सर्वतोपरी मदत करीत आहे. मात्र सरकार मदत करीत आहे म्हणुन आम्ही शांत बसू शकत नाही, जनतेला मदत व्हावी म्हणून आपल्या नेत्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. या माध्यमातून गरजवंतांच्या मुला-मुलींचे विवाह लावले जाणार आहेत. हा विवाह सोहळा अभुतपुर्व ठरणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, चित्रपट अभिनेते अक्षयकुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हे कार्य आपल्या घरचे समजून सर्वांनी सहभागी व्हावे, आपले एखादे लग्न असेल तर यात तेही लावावे असे सांगून या सोहळ्यात योगदान देऊन कन्यादानाचे पुण्य मिळवावे असे आवाहन केले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ऊसतोड मजूर महिलांनी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांचे औक्षण करून सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव यांनी तर संचलन व आभारप्रदर्शन ज्ञानोबा सुरवसे यांनी केले. कार्यक्रमास ऊसतोड मजूर, मुकादम, कर्मचारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.