जोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रितम मुंडेंनी भरला उमेदवारी अर्ज

टीम महाराष्ट्र देशा: बीड लोकसभेसाठी विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी बीड ते परळीदरम्यान जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रितम मुंडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंसह सहकुटुंब श्री वैद्यनाथांचं दर्शन घेतलं, त्यानंतर पांगरी येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

अर्ज भरतेवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री पंकजा मुंडे, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, यांच्यासह मुंडे कुटुंबीयांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रीतम मुंडे म्हणाल्या की भाजप समवेत सर्वच घटक पक्ष असल्याने माझा विजय निश्चित आहे, शिवाय मी केलेल्या विकासकामांसाठी बीडची जनता मला पुन्हा एकदा संधी देईल.

प्रितम मुंडे या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्या आहेत, त्यांचं कामही चांगलं आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. राज्यातील 45 पेक्षा जास्त जागा आमच्या निवडून येतील असं विधान प्रदेशध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केल.