लोकाभिमुख कामकाजास प्राधान्य द्यावे – गिरीश बापट

Girish_bapat

पुणे : सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख कामकाज करण्यास प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.इंदापूर येथील प्रशासकीय इमारतीच उद्घाटन बापट यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार दत्तात्रय भरणे, आमदार संजय भेगडे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, उपअभियंता धनंजय वैद्य, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे आदी उपस्थित होते.

बापट म्हणाले, नागरिकांच्या हितासाठी शासन विविध कायदे आणि योजना राबवित आहे, परंतू या कायद्यांची तसेच योजनांची सखोल माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे आवश्यक आहे. नागरिकांना जलद सेवा देण्याच्या उद्देशाने शासन संगणकीकरण्यावर भर देत आहे. पॉस मशीनद्वारे अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असल्यामुळे पुरवठा विभागाच्या कामात गतिमानता आणि पारदर्शकता आली आहे.

लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी या दोन्ही घटकांची जनतेशी बांधिलकी असते, त्यामुळे या दोहोंमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठीच शासकीय कार्यालयांची स्थापना करण्यात येते. नागरिकांशी सलोख्याचे संबंध ठेऊन, त्यांच्या कामाचे स्वरुप जाणून ती कामे पूर्ण होतील, असा विश्वास शासकीय अधिकाऱ्यांनी घ्यायला हवा. इंदापूर प्रशासकीय इमारतीत नागरिकांची कामे गतीने पूर्ण करुन देण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.