नोव्हेंबर महिन्यापासून ५००च्या नोटांची छपाईच नाही

टीम महाराष्ट्र देशा : नाशिकमधील करन्सी नोट प्रेसमध्ये रुपयांच्या नोटांती छपाई गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात थांबविण्यात आली आहे. नाशिकमधील करन्सी नोट प्रेसने 2017-18 या आर्थिक वर्षासाठी आरबीआयने दिलेलं 1800 दशलक्ष नोटा छापण्याचं टार्गेट पूर्ण केल्याने 500 रुपयांच्या नोटेची छपाई बंद केली आहे. याचबरोबर वीस आणि शंभराच्या नोटांची नवीन डिझाइन केंद्र सरकारने अद्याप मंजूर न केल्यामुळे या नोटांची छपाई नाशिकरोड प्रेसमध्ये 1 एप्रिलपासून थांबली आहे. यासंदर्भात वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिल आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मध्य प्रदेशातील देवास करन्सी नोट प्रेसला 200 रुपयांच्या नोटा छापण्याचे आदेश दिल्याने नाशिकमधील प्रेसने 200 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. नाशिकमधील प्रेस सध्या 10 व 50 रुपयांच्या नोटांची छपाई करते आहे.

बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रातील काही भागात एटीएममध्ये खडखडाट जाणवत आहे. नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या स्थितीप्रमाणे अनेक भागात एटीएम ‘कॅशलेस’ झाल्याचं नागरिक सांगत आहेत. मात्र नोटाबंदीनंतर (8 नोव्हेंबर 2016) असलेल्या चलनाच्या तुलनेत सध्या बाजारात खूप जास्त नोटा असल्याचा दावा सरकारने केला आहे. नोटाबंदीच्या वेळी 17.5 लाख कोटींपेक्षा जास्त रोकड चलनात होती, तर सध्या 18 लाख कोटींच्या पार रक्कम चलनात आहे, असं सरकारने सांगितलं.