सत्ताधाऱ्यांच्या कोत्या मनोवृत्तीचे पुन्हा एकदा दर्शन; पंतप्रधान आवास योजनेची सोडत रद्द

pawar-thackeray

पुणे : पंतप्रधान आवास योजने अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या नियोजित प्रकल्पातील सदनिकांच्या सोडतीचा कार्यक्रम काल ठरविण्यात आला होता.मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याच मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. प्रसिद्धी पत्रकात ते म्हणतात, या सोडतीसाठी मी व  उपमुख्यमंत्री अजीत पवार प्रमुख पाहुणे म्हणून नियोजित होतो. त्यानुसार उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयात रीतसर निमंत्रण ही देण्यात आले होते. मात्र अहंकाराने पछाडलेल्या सत्ताधाऱ्यांनी या कामाचे श्रेय भाजप ला मिळु नये यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तंबी देउन हा कार्यक्रम रद्द करायला लावल्याची निंदनीय घटना घडली.

चऱ्होली,बोऱ्हाडेवाडी,रावेत येथील सोडतीचा कार्यक्रम आज ठरला होता व ५/६ हजार गोरगरीब आपल्या स्वतःच्या मालकी हक्काचे घराचे स्वप्न साकार होइल यासाठी मोठ्या आशेने जमले होते,मात्र अहंगंडाने पछाडलेल्या सरकारने मुख्य सचिवां मार्फत मनपा आयुक्तां वर दबाव आणून ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना दिल्या. शासनाचे हे कृत्य निषेधार्ह आहेच पण त्याच बरोबर गोरगरिबांप्रती हे सरकार असंवेदनशील असल्याचे ही निदर्शक आहे.

राष्ट्रवादीचे नगरसेवक ही हा कार्यक्रम होवू नये यासाठी दमदाटी करत होते.मात्र पिंपरी चिंचवडची जनता सूज्ञ असून भाजपने केलेली विकासकामे यामुळे जनता भाजपच्याच पाठीशी आहे. श्रेयवादासाठी तडफडणारी राष्ट्रवादी अश्लाघ्य पद्धतीने प्रशासनावर दबाव आणून निरंकुश आणि  सत्तांध असल्याचे दाखवून देत आहे या प्रवृत्तीचा मी तीव्र निषेध करतो असे पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या