नव भारताच्या उभारणीसाठी युवापिढीने सज्ज रहायला हवे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : नव भारताच्या उभारणीसाठी युवापिढीने सज्ज रहायला हवे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केले. भ्रष्टाचार हटविण्यासाठी देशातील नागरिकांनी एकत्रित येऊन संकल्प करायला हवा. नागरिकांनी असा संकल्प केल्याखेरिज पारदर्शकतेची संस्कृती रुजणार नाही, असेही ते म्हणाले. देशाला बलशाली राष्ट्र म्हणून पुढे आणायचे असेल तर नागरिकांच्या एकजुटीशिवाय पर्याय नाही. स्वातंत्र्य लढ्यात १९४२ ते १९४७ या काळात देशातील नागरिकांनी याप्रमाणे एकजुटीचे दर्शन घडवत ब्रिटीशांना भारतातून घालवून दिले तसेच भ्रष्टाचार, जातपात हे दुर्गुण नष्ट करण्यासाठी नागरिकांनी आता एकत्र यायला हवे, असेही ते म्हणाले.