उत्तरप्रदेश सरकारचा तुघलकी निर्णय ; मोदींच्या वाढदिवशी चिमुकल्यांची सुट्टी रद्द

वेबटीम : उत्तरप्रदेश सरकारने राज्यातील सर्व प्राथमिक शाळांना मोदींचा वाढदिवस साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. यात विशेष बाब म्हणजे १७ सप्टेबर रविवार असून सुद्धा चिमुकल्यांना शाळेत हजर राहणे बंधनकारक आहे.

राज्यात १.६० लाख प्राथमिक शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अनुपमा जैस्वाल यांनी दिली. मतदारसंघातील दत्तक घेतलेल्या शाळांमध्ये त्या-त्या आमदारांनी उपस्थित राहावे. मोदींनी दिलेला स्वच्छतेचा संदेश आणि त्याचे महत्त्व त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना समजून सांगावे, असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केल्यास मोदींचे ‘स्वच्छ भारत’चे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल, असेही त्या म्हणाल्या. स्वच्छतेचे महत्त्व आणि त्याबाबत जनजागृती केल्यास मोदींसाठी ती वाढदिवसाची सर्वात मोठी भेट असेल, असेही त्या म्हणाल्या. मोदींच्या वाढदिवशी आयोजित कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित आमदारांना दिल्या.