‘विशिष्ट घटना’ असा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे लखीमपूर घटनेवर भाष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : देशात काही लोकांना विशिष्ट घटनांमध्येच मानवाधिकाराचं उल्लंघन होत असल्याचे दिसते अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लखीमपूर घटनेचे नाव न घेता केली आहे. आतापर्यंत एकदाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लखीमपूर घटनेबद्दल भाष्य केले नाही. पहिल्यांदाच त्यांनी या घटनेचा दाखला देत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडलेल्या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. विरोधकांना केंद्र सरकारला लक्ष करत मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर मोदींनी भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात हिंसक घटना घडल्या, की त्यावरुन मानवाधिकाराचा मुद्दा चर्चेत येतो आणि आरोप प्रत्यारोप केले जातात. अशा घटनांवर मानवाधिकार आयोग देखील भूमिका घेत असतो. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या २८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.

यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, मानवाधिकारांशी संबंधित एक अजून बाजू आहे. सध्याच्या काळात मानवाधिकाराची व्याख्या काही लोक आपापल्या पद्धतीने करु लागले आहेत. काही लोकांना हिंसाचाराच्या घटनेत मानवाधिकाराचे उल्लंघन दिसते. पण तशाच दुसऱ्या घटनेत याच लोकांना मानवाधिकाराचे उल्लंघन दिसत नाही. ही मानसिकता देखील मानवाधिकारासाठी धोकादायक आहे. असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

पुढे बोलताना मोदी म्हणाले, मानवाधिकाराचं उल्लंघन तेव्हा होतं जेव्हा त्याला राजकीय चष्म्यातून पाहिलं जातं. हे वर्तन लोकशाहीसाठी अपायकारक आहे. असेच सोयीनुसार वर्तन करणारे लोक मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या नावावर देशाच्या प्रतिमेला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांपासून सावध रहायला हवे. असे म्हणत पंतप्रधान मोदींनी टीकाकारांवर निशाणा साधला आहे. महात्मा गांधींनी देशाला अहिंसेच्या तत्वावर अधारलेल्या चळवळीतून स्वातंत्र्या मिळवून दिले, त्यामुळे जगभरातील लोक बापूंकडे मानवाधिकार आणि मानवी मूल्यांचे प्रतीक म्हणून पहातात, असेही मोदी यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या