‘गेल्या ७० वर्षांत उभे केलेले आता पंतप्रधान मोदी विकत आहेत’, राहुल गांधींचा हल्लाबोल

rahul gandhi

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मंगळवारी एक पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ‘भाजप आणि पंतप्रधान मोदी सतत म्हणतात की, गेल्या ७० वर्षांत काहीच झालं नाही. मात्र, गेल्या ७० वर्षांत जे उभं केलं गेलं, ती संपत्ती विकण्याचा निर्णय मोदी सरकार घेत आहे असा आरोप राहुल यांनी केला.

सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सहा लाख कोटी रुपयांच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा उपक्रमाची घोषणा केली. या योजनेंतर्गत रेल्वे, ऊर्जा ते रस्त्यापर्यंत अनेक मूलभूत सेवा-सुविधांच्या क्षेत्रातील सरकारी संपत्तीचं मॉनेटायझेशन केलं जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे.

गेल्या ७० वर्षांत देशात जेवढी संपत्ती उभी करण्यात आली, मोदी सरकारने फक्त ती संपत्ती विकून टाकण्याचे काम केले आहे. रेल्वेचं खासगीकरण करण्यात येत आहे. पंतप्रधान सगळं विकून टाकत आहेत. हे सगळं खासगीकरण एकाधिकारशाही आणण्यासाठी केलं जात आहे. पॉवर, टेलीकॉम, वेअर हाउसिंग, मायनिंग, एअरपोर्ट, पोर्ट्स या सगळ्याचं खासगीकरण एकाधिकारशाही आणण्यासाठी केलं जात आहे. तुम्हाला माहितीय की पोर्ट्स कुणाच्या हातात आहेत, एअरपोर्ट्स कुणाला मिळत आहेत.

एकाधिकारशाही निर्माण झाली तर त्याच गतीने तुम्हाला रोजगार मिळणं बंद होईल. मोदी सरकार भारताची संपत्ती विकत आहे, हे आपल्या भविष्यावर केलेलं आक्रमण आहे. मोदीजी आपल्या दोन-तीन उद्योगपती मित्रांसोबत भारताच्या युवकांवर आक्रमण करत आहे. हे नीटपणे तुम्ही समजून घ्या. सरकारने स्पष्टपणे अर्थव्यवस्थेचा गैरवापर केला आहे. सरकारने खरं तर यूपीए सरकारने जे बांधलंय ते उद्ध्वस्त करण्याचं काम केलंय. आता शेवटचा उपाय म्हणून, आम्ही तयार केलेल्या सर्व गोष्टी ते विकत आहेत. माझ्या दृष्टीने ही एक मोठी शोकांतिका आहे असे राहुल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या