पंतप्रधान मोदींनी केली राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपेज धोरणाची घोषणा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये गुंतवणूकदार शिखर परिषदेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीदेखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपेज धोरणाची घोषणा केली आहे. हे धोरण नवीन भारताच्या वाहन क्षेत्राला नवी ओळख देणारे ठरणार आहे. हे धोरण देशातील कामात नसलेल्या वाहनांना वैज्ञानिक पद्धतीने बाजूला काढण्यात मोठी भूमिका बजावेल असे मत मोदींनी व्यक्त केले आहे.

यासोबतच जुनी कार स्क्रॅप केल्यावर प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ज्या व्यक्तीकडे हे प्रमाणपत्र असेल त्याला नवीन वाहन खरेदीवर नोंदणीसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. तसेच रस्ते करातही सूट दिली जाणार आहे. जुनी वाहने, जुन्या तंत्रज्ञानामुळे रस्ते अपघाताचा धोका खूप वाढला आहे. यामुळे हा धोका कमी होऊन प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारा परिणामही कमी होईल अशीब आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

हे धोरण मेटल क्षेत्रातील देशाच्या स्वावलंबनाला नवी ऊर्जा देईल. या धोरणामुळे देशात १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होईल आणि हजारो रोजगार निर्माण होतील असे मोदी यांनी म्हटले आहे. दरम्यान १५ आणि २० वर्षे जुनी वाहनांवर बंदी घातली जाईल. व्यावसायिक वाहनांसाठी १५ वर्षे आणि खासगी वाहनांसाठी २० वर्षाचा कालावधी ठऱवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या