प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदल्यांची कार्यवाही तातडीने करावी

... अन्यथा आमरण उपोषणास बसण्याचा इशारा

अहमदनगर : २७ फेब्रुवारीच्या २०१७ च्या शासन निर्णयान्वये बदली प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना, जिल्हाअंतर्गत बदल्यांची कार्यवाही त्वरीत पूर्ण करुन लगेच कार्यमुक्तीचे आदेश देण्याची मागणी प्राथमिक शिक्षक बदली हवी असलेल्या शिक्षकांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सदर शासन निर्णयान्वये जिल्हाअंतर्गत बदल्यांची कार्यवाही ११ नोव्हेंबर पूर्वी न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

सन २०१७-१८ च्या शैक्षणिक वर्षातील पहिले सत्र संपलेले असून दुस-या शैक्षणिक सत्राची लवकरच सुरुवात होत आहे. यामुळे बदल्यांची कार्यवाही त्वरीत करुन कार्यमुक्त केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.गेल्या अनेक वर्षापासून गैरसोईच्या ठिकाणी काम करणारे अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बदलीची आतुरतेने वाट पाहत आहेत. शासनाने प्रथमच २७ फेब्रुवारीचा सर्वसमावेशक शासन निर्णय आणून त्यांच्या आशा पल्लवित केल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. २७ फेब्रुवारीच्या २०१७ च्या शासन निर्णयान्वये विशेष शिक्षक संवर्ग भाग १ मधील विधवा,परित्यक्ता,कुमारिका यांना ख-या अर्थाने न्याय मिळून सोयीच्या ठिकाणी बदली होणार आहे. तसेच भाग २ अंतर्गत तीस किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरील पती पत्नीचे एकत्रीकरण होवून त्यांचे कुटुंब एक होवू शकणार आहे.तर वर्षानुवर्षे द-याखो-यात,डोंगराळ,दुर्गम भागात काम करणा-या शिक्षकांना न्याय मिळून प्रथमच ते सोयीच्या ठिकाणी येणार आहेत. संवर्ग ४ मधील अर्थात बदलीपात्र असणारे टप्पा क्रमांक ५ मधील हे शिक्षक सध्या गैरसोयीच्या ठिकाणी आहेत व त्यांना विनंती बदली हवी आहे अशा शिक्षक-शिक्षिकांची बदली कार्यवाही त्वरीत करुन लगेच कार्यमुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

You might also like
Comments
Loading...